Dapoli News – कादिवलीतील सार्वजनिक शौचालयच गायब, ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
दापोली तालुक्यातील कादिवली गावातील गावठाण वाडीत शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालयच रहस्यमयरीत्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थ संतोष पांडुरंग जगदाळे यांनी दापोली गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सन २००२ ते २००७ या कालावधीत ‘संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना’ अंतर्गत १४ कुटुंबांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांकडून त्याचा वापरही होत होता. मात्र, कालांतराने बहुतांश घरांमध्ये वैयक्तिक शौचालये उभारली गेल्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर कमी झाला.
काही दिवसांपूर्वी संतोष जगदाळे यांच्या घरातील शौचालयात बिघाड झाल्याने ते सार्वजनिक शौचालय वापरण्यास गेले असता, तेथे शौचालयच अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित केला तसेच परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. मात्र, शौचालय नेमके कधी आणि कसे गायब झाले, याबाबत कोणाकडूनही समाधानकारक माहिती मिळाली नाही.
या प्रकारामुळे शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शौचालय पाडण्यात आले की त्यातील साहित्याची चोरी झाली, याची सखोल चौकशी व्हावी तसेच संबंधित जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून, सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
Comments are closed.