दापोलीत मारुती–होंडा कारची समोरासमोर धडक, दीड वर्षांच्या चिमुरडीसह अन्य जखमी
दापोली शहरातील नवानगर येथील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सायंकाळी मारुती आणि होंडा या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दीड वर्षांच्या चिमुरडीसह दोन्ही वाहनांतील अन्य प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळेहून दापोलीकडे येणारी मारुती कार आणि दापोलीहून खेडच्या दिशेने जाणारी होंडा कार यांची नवानगर येथील पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. या अपघातामुळे दापोली–खेड मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी अपघात झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
Comments are closed.