Dapoli News – झंझावातासह आलेल्या वळीवाच्या पावसाने मंडणगडकरांची उडाली त्रेधातिरपीट
झंझावातासह आलेल्या वळीवाच्या पावसाने मंडणगड तालुक्यातील ठिक ठिकाणच्या गावातील घरांची पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणच्या गावांकडे जाणाऱ्या तसेच तालूका ठिकाणी येणा-या महत्वाच्या मार्गावर झाडे कोसळून पडल्याने वाहतूक बंद पडण्याच्या सर्रास घटना घडल्या आहेत. वादळामुळे काही गावांतील विज वाहक वाहीन्यांवर झाडे कोसळून पडल्यामुळे तेथील विज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी ९ मे रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली.
मंडणगड तालुक्यातील टाकवली , पेवे , बोरखत , दहागाव , घराडी , तोंडली , नारगोली , पणदेरी , कोंडगाव , तळेघर , तिडे , वडवली आदि अनेक गावांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या निवासी घरांची अचानकपणे भर दुपारी घोंघावत आलेल्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.त्यामुळे त्यांचे खुपच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर राहत्या निवासी घरांच्या पडझडीची घटना घडल्याने राहत्या घरांच्या दुरुस्तीची कामे आता पावसाळ्याच्या आधी कशी पूर्ण करता येतील याचीच चिंता नुकसानग्रस्तांना सतावत आहे. वादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या काही नुकसानग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरांवरील पत्रे, कौलारु छत घोंघावलेल्या वादळाने पार उध्वस्त करून टाकल्याने अनेकांचे किंमती साहीत्य त्यात पार भिजल्याने मोठीच आपत्त नुकसानग्रस्तावर कोसळली. त्यातच अनेक गावांमधील विदयुत वाहीण्यांचे विदयुत पोल आडवे झाल्याने अनेक गावांचा विदयुत पुरवठा खंडित झाल्याने तो सुरळीत करण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागण्याची शक्यता आहे. संपर्क आणि दळवळणासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या मार्गावर झाडे कोसळून आडवी पडल्याने मंडणगड तालुक्यातील महत्वाच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत मार्ग वाहतूकयोग्य करण्यासाठी प्रशासनासह स्थानिक मेहनत घेत होते. दरम्यान महसूल विभागाला आज सुटृटी असतानाही त्या त्या ठिकाणचे तलाठी हे झाल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी बाधीत गावातील नुकसानग्रस्त ठिकाणी पोहोचले होते. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामे करण्याचे काम महसूल कडून सुरू होते. एकुण किती गावातील घरांचे, सार्वजनिक इमारतींचे तसेच मालमत्तांचे कीती रुपयांचे नुकसान झाले आहे हे पंचनामे केल्यावर सोमवार नंतरच खऱ्याअर्थाने नुकसानीची खरी आकडेवारी समजून येईल. तो पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशाच प्रकारे दापोली तालुक्यातील दापोली तालुक्यातील सोंडेघर ,मुगीज आणि पिसई येथील काही घरांचे पत्रे तसेच कौले उडून पडझड झाल्याची घटना घडली आहे. तसेच हापूस आंबा खाली गळून पडल्याने आंबा बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.
Comments are closed.