अतिवृष्टीत डोंगरावरून रस्त्यावर आलेला मलबा हटवलाच नाही, तलासरीत अपघाताचा धोका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अतिवृष्टीमुळे डोंगरावरून रस्त्यावर आलेला मलबा अद्याप न हटवल्यामुळे तलासरीत अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात डोंगराचे कडे कोसळून माती आणि मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शालेय विद्यार्थी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या तलासरी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेजवळ जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन झाले होते. या भूस्खलनामुळे डोंगराची लाल माती आणि मोठे दगड थेट रोडवर आले आहेत. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, तरीही संबंधित प्रशासनाने ही माती हटवलेली नाही. विद्यालयात ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्त्याचा मोठा भाग मातीने व्यापल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून उरलेल्या रस्त्यावरून चालावे लागत आहे. पादचाऱ्यांनाही येथून जाताना कसरत करावी लागत असून एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतुकीला अडथळा; अपघाताचे निमंत्रण

सर्व्हिस रोडवरून दुचाकी आणि इतर वाहनांची सतत वर्दळ असते. रस्त्यावरील मातीमुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने एखादा मोठा अपघात घडू शकतो. दोन महिने होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा संबंधित स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments are closed.