…तर रोहित आर्यचे पैसे मिळाले असते, मुलांना ओलीस ठेवणं अत्यंत चुकीचं, दीपक केसरकर काय म्हणाले?


दीपक केसरकर पवई बंधकांच्या भीतीवर मुंबईतील हाय प्रोफाईल परिसरात गुरुवारी घडलेल्या खळबळजनक घटनेनं संपूर्ण देश हादरला. गुरुवारी पवईतील एका इमारतीत रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 लहान मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलेलं. अशातच पोलिसांनी त्या सर्वांची सुखरूप सुटका केली. मात्र, आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला. आरोपीच्या छातीत गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशातच आरोपीनं सरकारवर गंभीर आरोप केलेत. तसेच, राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं रोहितचे पैसे थकवल्याचा आरोप त्याच्याकडून केला जात असून यासाठी दोनवेळा त्यानं उपोषण देखील केलं होतं. अशातच तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये असतो तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. तसेच, मी त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे माझ्याशी बोलून काही झालं नसतं, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

दीपक केसरकर म्हणाले की, “शासनाकडे कुणाचेच पैसे शिल्लक राहत नाहीत… त्यांच्याबाबतीत असं झालेलं की, त्यांनी एक वेबसाईट अॅक्टिव्ह केलेली आणि त्यासाठी मुलांकडून पैसे घेतलेले. त्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की, त्यांनी मुलांकडून घेतलेले पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही हे लिहून द्यावं… जर त्यांची याची पूर्तता केली असती तर, त्यांचं बिल मिळायला कसलीही अडचण असू नये, असं मला स्वतःला वाटतं. त्यासाठी त्यांनी त्याची पूर्तता करायला पाहिजे, पण त्याऐवजी त्यांनी हा मार्ग अवलंबला तो मात्र पूर्णपणे चुकीचा आहे. आता मुलांना ओलीस ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं जर झालं तर, मग लोकांना असा मार्ग मिळून जाईल… त्यामुळे योग्य वेळेला यावर प्रतिबंध घातला पाहिजे. पोलिसांनी मुलांची सुखरुप सुटका करणं ही आनंदाची बाब आहे, पण रोहित आर्य यांचा अशाप्रकारे मृत्यू होणं याचंही मला दुःख होतंय… खरंच त्यांचे असे पैसे येणं असेल, तर ते त्यांच्या कुटुंबीयांना मिळावेत यासाठी मी आवश्यक प्रयत्न करेन…”

शासनाचे नियम आहेत, त्याचं पालन करूनच त्यांना त्याचं बिल मिळू शकतं : दीपक केसरकर

“दोन कोटी रुपये रोहित आर्य यांची थकबाकी नव्हती… कसंय आम्ही जी प्रोव्हिजन करतो, ती पूर्णपणे त्या स्किमसाठी असते… त्यासाठी व्हॉलेंटियर्सनी काम केलं, त्यांचा मोबदला आणि इतर खर्च… ती काय एका व्यक्तीला देण्यासाठी दोन कोटींची तरतूद नसते… त्यामुळे हा त्यांचा केवळ गैरसमज होता… त्यावेळी त्यांना आंदोलन केलं, तरी मी त्याचवेळी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घडवून आणलेल्या होत्या… त्यावेळी त्यांनी आंदोलनही मागे घेतलेलं, त्यांना जर कोणत्याही संदर्भात मदत हवी होती, तर त्यांनी संपर्क साधायला हवा होता… तशी मदत मागायला पाहिजे होती, मदत करायची सगळ्यांचीच तयारी असते… त्यांचं बिल यायला वेळ लागणार होता, त्यामुळे मी वैयक्तिकरित्या त्यांना थोडीफार मदत केलेली. आमचा दृष्टीकोन सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याला मदत करण्याचाच असतो, पण शासनाचे नियम आहेत, त्याचं पालन करूनच त्यांना त्याचं बिल मिळू शकतं, ही वस्तूस्थिती आहे…”, असं दीपक केसरकर म्हणालेत.

…तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो : दीपक केसरकर

“मुलांना ओलीस धरून अशा पद्धतीनं संवेदनशील प्रकरणात मला फोन करणं आणि मुलांना काहीतरी केलं असतं तर, अडचणीचं ठरलं असतं. त्यामुळे अशा प्रकरणी पोलिसांनी सुटका करणं योग्य आहे. मुंबईमध्ये असतो तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो. मी त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे माझ्याशी बोलून काही झालं नसतं. मुलांना ओलीस धरलं चुकीचं असून अशा प्रकारे पायंडा पडला असता. संबंधित खात्याशी चर्चा करून त्यांनी मार्ग काढला पाहिजे होता….”, असं दीपक केसरकर म्हणाले.

रोहित आर्यचा आरोप नेमका काय?

रोहित आर्य हे स्वच्छा मॉनिटर नावाची एक स्किम चालवत होते. ते शासनाच्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. पण, रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की, आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही. याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं

मुंबईच्या हायप्रोफाईल एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवईतील महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून सिनेमा, वेब सीरीजसाठी कास्टिंग केलं जात होतं. त्यासाठी, 17 जणांचं फायनल कास्टिंग झालं. त्यामुळेच, इथल्या स्टुडिओत 17 मुलं आणि दोन पालक उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या वेळेत ही मुलं स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर पालक चिंतेत होते. कारण, ही मुलं काचेतून आपला हात दाखवत इशारा करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतरच हा किडनॅपिंगचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं. स्वत:ला फिल्ममेकर समजणाऱ्या आरोपी रोहित आर्यनं हे कृत्य केलं होतं. पण नंतर प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. आरोपीनं सरकारवर गंभीर आरोप करत, आपले पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यातूनच वैफल्यग्रस्त होऊन हे कृत्य केलं. तसेच, आरोपींनं सरकारसोबत काही वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ : दोन कोटींची थकबाकी नव्हती : दीपक केसरकर

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

आणखी वाचा

Comments are closed.