वास्तव चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची मोठी फसवणूक; आर्थिक गंडा घातला, नेमकं काय घडलं?

आगामी चित्रपटात फसवणूक केल्याचा दीपक तिजोरीचा आरोप मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता दीपक तिजोरी यांच्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. त्यांच्या आगामी हिंदी चित्रपट  ‘टॉम डिक अँड मेरी’ या चित्रपटासाठी निधी मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांना 2.5 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या तक्रारीवरून मुंबईतील बांगूर  नगर पोलीस ठाण्यात दोन महिलांसह आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक तिजोरी हे गोरेगाव पश्चिम येथील गार्डनर इस्टेटचे रहिवासी आहेत. ते 1990 पासून चित्रपट उद्योगात कार्यरत आहेत. डिसेंबर 2024मध्ये त्यांनी त्यांच्या  टॉम, डिक अँड मेरी या चित्रपटाची पटकथा पूर्ण केली.  या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अंदाजे 25 कोटी  रूपयांची गुंतवणूक आवश्यक होती.

नेमकं काय घडलं?

तक्रारीत तिजोरींनी म्हटलं की, फेब्रुवारी 2025च्या  पहिल्या आठवड्यात कविता शिबाग कपूर नावाची एक महिला तिजोरीच्या घरी आली होती. तिनं टी सीरीजशी संबंधित असल्याचा दावा केला होता.  तसेच तिनं  झी नेटवर्क आणि मिडिया इंडस्ट्रीमध्ये मजबूत संबंध असल्याचा दावाही केला होता.  यानंतर कविताने तिजोरीची तिच्या सहकारी फौजिया आरसीशी ओळख करून दिली. तिनं सांगितलं की, तिला झी नेटवर्ककडून चित्रपटासाठी लेटर ऑफ इंटरेस्ट मिळू शकेल. यामुळे गुंतवणूकदारांना  आकर्षित करण्यास मदत होईल, असं तिनं सांगितलं.

दोन्ही महिलांनी एका आठवड्यात LOI देण्याचे आश्वासन दिले होते.  पहिला हप्ता म्हणून अडीच लाख मागण्यात आले. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत  21 फेब्रुवारी 2025 रोजी करार (MoU) करण्यात आला. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2025 रोजी दीपक तिजोरीने  फौजिया आरसीच्या बँक खात्यात अडीच लाख रूपये ट्रान्सफर केले. दरम्यान, बराच काळ उलटूनही झी नेटवर्ककडून लेटर ऑफ इंटरेस्ट मिळालेला नाही, ना पैसे परत मिळाले.  तक्रारीत असेही म्हटले की, तिजोरी यांना  झी नेटवर्कचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या जोशी नावाच्या  व्यक्तीशी फोनवर संपर्क साधण्यात आला.   नंतर झी नेटवर्कच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून  पडताळणी केल्यावर असे दिसून आले की, त्या नावाचा कोणताही व्यक्ती  संस्थेत कार्यरत नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, दीपक तिजोरी यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला.  तक्रारीच्या आधारे 13 जानेवारी 2026 रोजी बांगूर नगर पोलिसांनी  कविता शिबाग कपूर, फौजिया आरसी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.