दिल्लीची दबंगगिरी! पंजाबच्या किंग्सचा पराभवाचा चौकार, पॉइंट टेबलमध्ये टॉपच्या संघांचे धाबे दणाद

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स IPL 2026 : आयपीएल 2026 च्या 55व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर 3 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीच्या 7 सामन्यात अजिंक्य राहिलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सला आता सलग चौथ्या पराभवाचा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 210 धावांचा डोंगरा उभा केला. मात्र, इतकी मोठी धावसंख्या उभारूनही पंजाबच्या नशिबात पराभवच होता. दिल्लीसाठी शेवटच्या षटकांमध्ये आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी फिनिशरची भूमिका बजावत अवघ्या 19 षटकांतच लक्ष्य पूर्ण केले.

पंजाबची दमदार सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. प्रियांश आर्या (56 धावा, 33 चेंडू) आणि प्रभसिमरन सिंग (18 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची स्फोटक भागीदारी केली. प्रियांशने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

कर्णधार श्रेयस अय्यरची ‘कॅप्टन इनिंग’

सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने डावाची सूत्रे हाती घेतली. अय्यरने 36 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी करत संघाला द्विशतकी टप्पा ओलांडून दिला. त्याला मध्यफळीत कूपर कॉनोली (38 धावा) आणि शेवटच्या षटकांत सूर्यांश शेडगेने (8 चेंडूत 21* धावा) मोलाची साथ दिली. दिल्लीकडून मिचेल स्टार्क आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, मुकेश कुमारला 1 गडी बाद करण्यात यश आले.

दिल्लीची खराब सुरुवात, पण मधल्या फळीने सावरले

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर केएल राहुल (9) आणि अभिषेक पोरेल (5) स्वस्तात परतले. तसंच साहिल पारख (13) आणि ट्रिस्टन स्टब्स (12) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले, त्यामुळे दिल्लीची अवस्था 4 बाद 74 अशी झाली होती.

अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलरची वादळी खेळी

संकटात सापडलेल्या दिल्लीला कर्णधार अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांनी सावरले. अक्षर पटेलने 56 धावा (30 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार) तर डेव्हिड मिलर 51 धावा (28 चेंडू, 3 चौकार, 4 षटकार) केल्या. या दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी 64 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून विजयाचा पाया रचला.

शेवटच्या षटकांत आशुतोष आणि माधवची फटकेबाजी

अक्षर आणि मिलर बाद झाल्यानंतर सामना पुन्हा एकदा पंजाबच्या बाजूने झुकताना दिसत होता. मात्र, आशुतोष शर्माने अवघ्या 10 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर माधव तिवारीने 8 चेंडूत नाबाद 18 धावा आणि औकिब नबी दारने फक्त 2 चेंडूत 10 धावा फटकावून दिल्लीला 19व्या षटकातच विजय मिळवून दिला.

गुणतालिकेतील समीकरण बदलले

या पराभवानंतरही पंजाब किंग्स गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे, पण त्यांच्या प्ले-ऑफच्या वाटेत अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने मोठी झेप घेतली आहे.

हे ही वाचा –

Tim David News : LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.