पार्थ पवारांचा पाय खोलात, सही असलेला महत्वाचा दस्तावेज सापडला, मुद्रांक विभाग अन् पोलिसांकडून व


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ (Parth Pawar) पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. याप्रकरणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर हल्लाबोल करत महायुती सरकारलाही धारेवरती धरलं आहे. अशातच या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्याचं समोर आलं आहे. तक्रारदाराने ३ जणांवर सुमारे 6 कोटींचा मुद्रांक शुल्क न भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी पोस्ट लिहून काही सवाल उपस्थित केले आहेत.

Sushma andhare: पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं?

सुषमा अंधारे यांनी या जमिन प्रकरणातील एक कागदपत्र शेअर केले आहे, त्यावरती पार्थ पवारांनी सही केल्याचं दिसून येत आहे. त्याबाबत सवाल उपस्थित करत सुषमा अंधारेंनी म्हटलंय की, ”पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का ? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं?” असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे अमेडा कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे आणि दिग्वीजय फक्त एक टक्का भागीदार आहेत‌. मात्र पार्थ यांच्या ऐवजी दिग्वीजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parth Pawar Land: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचं नाव जमीन घोटाळा प्रकरणी चर्चेत आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर या प्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग १ संतोष अशोक हिंगाणे यांनी प्रशासकीय चौकशी करून तक्रार दिली आहे. या प्रकरणी ४२०, ४०९, 334 आणि भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (4) 316 (5) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. ३ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव समोर आलं आहे. पण सध्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, अमेडिया इंटरप्राइजेस एल. एल. पी. चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुख्यातपत्र असणारी महिला शीतल तेजवानी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती बावधान पोलिसांनी दिली.

Anjali Damania: FIR झाला पण त्यातही scam?

या प्रकरणी सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत म्हटलंय, FIR झाला पण त्यातही scam? पार्थ अजित पवारचे नाव नाही आणि कंपनीचे पण नाव नाही? का? ह्यातून सुद्धा वाचवण्याची तयारी ? बास करा राजकारण. चौकशी करा आणि शिक्षा द्या. ह्या वेळी जी समिती स्थापन होईल, त्यात फक्त शासकीय अधिकारी नाही, जनतेतून सुद्धा प्रतिनिधी हवेत. मी हे प्रतिनिधित्व करायला तयार आहे.

Ambadas Danve: पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचे नाव साफ साफ वगळण्यात आले

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट करत म्हटलंय की, कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल तर झाला पण या मध्ये पार्थ पवार अथवा त्यांच्या कंपनीचे नाव साफ साफ वगळण्यात आले! म्हणजे सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत.. ते ही प्रकरण उघडकीस आल्याच्या अवघ्या २४ तासात.. असं नाही चालणार मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदय.. या विषयाची चौकशी करणारे अधिकारी विकास खार्गे निश्चितच स्वच्छ प्रतिमेचे आहेत. पण प्रकरणात गुंतलेली नावे पाहता यामध्ये कडक बाण्याचे एक निवृत्त न्यायमूर्तीही सरकारने द्यायला हवेत.

आणखी वाचा

Comments are closed.