एक रुपयात पीक विमा योजनेत बदल होणार, सुधारित योजना लागू करणार : देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील कुटुबीयांना शासनाकडून 50 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या एक रुपया पीक विमा योजनेबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस एक रुपयात पीक विमा योजनेबाबत काय म्हणाले?
मागील काळात पीक विमा योजना चालवत होतो, त्यामध्ये अनेक घोटाळे पाहायला मिळाले. एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्यानंतर लाखो बोगस अर्ज या पाहायला मिळाले. हजारो कोटींचा अपव्यय होतोय, अशी षड्यंत्र लोकांनी केले. गरजू शेतकरी ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करुन सुधारित पद्धतीनं योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपनीचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे, अशा प्रकारे ही विमा योजना नव्यानं तयार करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणं, वेगवेगळ्या प्रकारे, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ अशा वेगवेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यात गुंतवणूक वाढवायची यासाठी स्वतंत्र योजना मंत्रिमंडळानं मान्य केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नेमका निर्णय काय?
सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवण्यात येईल. तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवली जाणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना मदत
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो सोडवणं, रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे. सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादाने ज्यांच्या मृत्यू झालाय त्यांच्या परिवाराच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे.
राज्य सरकारनं नवं ईलेक्ट्रिक वाहनांसाठीचं धोरण ठरवलं आहे. ईव्हीच्या प्रवासी वाहनांना काही रस्त्यांवर टोलमाफी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिप ब्रेकिंग, शिप बिल्डिंग वाढली पाहिजे त्यातून रोजगार निर्मिती होते व अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तीन बंदरे इथे आहेत. त्यामुळे हा व्यवसाय उभा करून शकतो,त्यादृष्टीने एक पॉलिसी मान्य केली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, सुधारित पीक विमा कशी असणार यासंदर्भातील माहिती लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
अधिक पाहा..
Comments are closed.