धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल; प्रणिती शिंदेंचा घणाघात
धनंजय मुंडे राजीनामा प्रणिती शिंदे: सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दबाव वाढत चालला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी (दि. 04) अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. मात्र, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं ट्विट त्यांनी केलंय. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, वैद्यकीय कारणामुळे राजीनामा म्हणजे नैतिक जबाबदारी देखील हे स्वीकारायला तयार नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून व्हिडीओ काढण्यात आला हे जगजाहीर आहे. संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने झालेत आणि आता राजीनामा घेतायत. हा राजीनामा केवळ फार्स आहे, सहा महिन्यानंतर म्हणतील की काहीही निष्पन्न झालं नाही आणि पुन्हा मंत्रीपद दिलं जाईल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, त्यांचे नाव (धनंजय मुंडे) सहआरोपी म्हणून या प्रकरणात आलं पाहिजे. हे पहिलं प्रकरण नाही, उघडकीस आलेलं हे पहिलं प्रकरण आहे. या जिल्ह्यात अशा अनेक निष्पाप लोकांच्या हत्या झाल्या. त्या उघडकीस आल्या नाहीत. ज्या पद्धतीने हत्या झाली ते पाहवत नाही, फोटो पाहिल्यावर लोकांना रात्रभर झोप नाही. हे सरकार मात्र निवांत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, सर्वांनाच आरोपी केलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
सरकार म्हणून सत्तेत राहण्याची तुमची लायकी नाही
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे IB द्वारे हे फोटो आधीच पोहोचले असतील, पण तरी देखील त्यांनी राजीनामाचा आग्रह केला नाही. हे सगळे एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत, तू माझं झाक आणि मी तुझं झाकतो, असं हे सगळं सुरु आहे. वरपासून खालपर्यंत सगळे भ्रष्टाचारी आहेत, सर्वांच्याच हाताना रक्त लागलेलं आहे. त्यांचे आमदार, खासदार सगळेच भ्रष्टाचारी आहेत, गेंड्याच्या कातडीची लोकं आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा अंत बघण्याचं कामं सुरु आहे. सरकार म्हणून सत्तेत राहण्याची तुमची लायकी नाही, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केलाय.
https://www.youtube.com/watch?v=SKMF-GAWRX4
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.