धारावी उड्डाणपूल दिवाळीनंतर बंद होणार
शीव उड्डाणपूल खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडीपासून मिळालेला दिलासा ‘तात्पुरता’ ठरणार आहे. शीवपाठोपाठ धारावी उड्डाणपूल दिवाळीनंतर बंद केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कुर्लादरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम करण्यासाठी हा ब्रिटिशकालीन पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पूल बंद राहणार असल्यामुळे मध्य मुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
पालिकेच्या शीव रुग्णालयाशेजारील डाह्याभाई शहा उड्डाणपूल ‘शीव रुग्णालय ब्रिज’ म्हणून ओळखला जातो. मध्य मुंबईत धारावी, शीव आणि आजूबाजूच्या भागांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे पूल बंद झाल्यानंतर पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर वाहतूक वळवण्याचे नियोजन आणि संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पूल बंद केला जाणार आहे. प्रस्तावित पुनर्बांधणीच्या कामांतर्गत रेल्वे मार्गावरून जाणारा पुलाचा भाग मध्य रेल्वेद्वारे बांधला जाणार असून, पुलाकडे जाणारे रस्ते बांधण्याची जबाबदारी पालिकेची असेल. वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यापूर्वी पादचारी पूल किंवा इतर योग्य पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे.
रुग्णवाहिका सेवेवर परिणाम होणार
शीव उड्डाणपूल दोन वर्षांपासून बंद होता. याकाळात वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. वाहनधारकांना अनेकदा गर्दीने भरलेल्या ‘90 फूट रोड’चा वळसा घ्यावा लागत होता. तीच कोंडी आता धारावी उड्डाणपूल बंद झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे. कोंडीचा परिणाम शीव रुग्णालयातील रुग्णवाहिकांच्या सेवेवर होणार आहे.
Comments are closed.