डोंबिवलीतील झाडे, वेलींना ‘शॉक’, पर्यावरणप्रेमींची पालिका आयुक्तांकडे तक्रार
कल्याण-शिळ महामार्गावरील विको नाक्याजवळ असलेल्या रिजन्सी अनंतम् गृहसंकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर एलईडी माळांची रोषणाई केल्याने झाडे आणि वेलींना शॉक बसत आहेत. झाडांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणप्रेमींनी या रोषणाईला विरोध केला आहे. याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे पर्यावरणप्रेमींनी लेखी तक्रार केली आहे.
दसऱ्यापासून सुरू केलेली ही रोषणाई दिवाळीपर्यंत ठेवण्यात येणार आहे. रिजन्सीने नवीन गृहप्रकल्पांच्या जाहिरातीसाठी झाडांवर रोषणाई केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. झाडांवर विद्युत माळा लावण्यास न्यायालयाने बंदी घातली असतानाही नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे. झाडांवरील रोषणाई तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
अन्यथा न्यायालयात दाद
महापालिका क्षेत्रात अन्य ठिकाणीही असे प्रकार होत असल्यास त्यावर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. रोषणाई काढली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. राजू नलावडे, राजीव तायशेटे, माधव घुले, विवेक पंडित, माधव जोशी, अविनाश कुबल यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमींनी आयुक्तांना निवेदन दिले. या तक्रारीवर महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय कारवाई करतात, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.