दाभोसा आश्रमशाळेत आनंदाचे दीप उजळले, विध्यार्थ्यांनी प्रज्वलित केले एक हजार दिवे
दिवाळीनिमित्त दाभोसा आश्रमशाळेत आनंदाचे दीप उजळले. शनिवारी सायंकाळी आश्रमशाळेत ‘माझी शाळा, माझा दीपोत्सव’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण शाळा परिसर 1008 दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघाला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून तीन हजारांहून अधिक दिव्यांची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, श्रमप्रतिष्ठा, सांस्कृतिक जाणीव आणि सामूहिक कार्यभावना विकसित होण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी विविध आकर्षक कंदील तयार करून शाळेची सजावट केली. तसेच रायगड, तोरणा, प्रतापगड आणि सिंहगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना आपल्या आदिवासी संस्कृती, रूढी-परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मातीपासून किल्ले तयार करणे, कागदकाम, आकर्षक कंदील निर्मिती आणि विविध कलात्मक उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्याध्यापक गजानन लुटे, कला शिक्षक महेश भोये यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
पर्यावरणपूरक दीपोत्सव
या दीपोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी संस्कृती आणि स्थानिक परंपरांची जपणूक करणारी अभिनव सजावट. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या चिभड फळाचा वापर करून त्यामध्ये दिवे प्रज्वलित करण्यात आले. यामुळे पारंपरिक साधनांचा कलात्मक वापर करत पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
Comments are closed.