हेतू – चवीचा प्रवास

>> राहुल गोखले

मराठी चित्रपट संगीताने वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घातले आहे. मात्र, गाणे ऐकण्यातील मजा त्यातील मर्म जाणून घेतल्याने दुणावते, यात शंका नाही. चित्रपटातील गाणे हे त्यातील प्रसंगाला धरून असते आणि म्हणूनच ती पार्श्वभूमी जाणणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच गीतकारांच्या शब्दांमागील व त्या शब्दांना संगीताचा साज चढविताना संगीतकाराने केलेला विचार समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मार्तंड औघडे यांनी ‘धुंदी कळ्यांना’ या पुस्तकातून अशा अंगाने श्रवणीय गाण्यांचे आस्वादक रसग्रहण केले आहे.

लेखकाने निवडलेल्या गाण्यांचा काळ मोठा असून, 1953 मध्ये आलेल्या व आचार्य अत्रे यांनी निर्मिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ चित्रपटातील त्यांनीच लिहिलेल्या ‘भरजरी गं पितांबर, दिला फाडून’ या गीतापासून ते 1986 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘पुढचे पाऊल’ चित्रपटातील ‘एकच या जन्मी जणू’ या गीतापर्यंतच्या एकूण 28 गाण्यांचा समावेश केला आहे. हे रसग्रहण केवळ गाण्यांच्या पंक्ती आणि संगीताची शास्त्रीय बाजू यापुरते मर्यादित नसून, लेखक त्या त्या चित्रपटाचे कथानक धावत्या स्वरूपात सांगत गीताच्या शब्दरचनेमागील आणि चालीतील पदर उलगडून दाखवतो. त्यामुळे गाणे कोणत्या पार्श्वभूमीवर आहे याची कल्पना वाचकाला येतेच, पण त्यावरील लेखकाच्या खुसखुशीत विवेचनामुळे पुस्तकाची रंगत वाढते. उदाहरणार्थ, ‘अपराध’ चित्रपटातील मधुसूदन कालेलकर लिखित व एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सांग कधी कळणार तुला…’ या गीताबद्दल लेखक म्हणतो की, ‘या त्रिदल काव्यातून प्रेमाची अनुभूती व्यक्त करण्यासाठी कालेलकरांनी निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर मोठय़ा कल्पकतेने केला आहे. अशा गीतांसोबतच, 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आपली माणसं’ चित्रपटातील कवी सौमित्र यांचे ‘नकळता असे ऊन मागून येते’ हे जीवनाचे मर्म सांगणारे गीत कसे आहे हे लेखक उलगडून दाखवतो. चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रसंगांचा उल्लेख करत पहिल्या कडव्यातील सहज प्रसन्नता, दुसऱ्या कडव्यातील एकाकीपणाची चाहूल आणि तिसऱ्या कडव्यातील आर्तता अशा सौमित्र यांच्या शब्दांमधील अर्थाची जाणीव लेखक करून देतो.

‘धाकटी बहीण’ चित्रपटातील ‘पुस्तकाच्या शीर्षकाचे गीत’ हे मराठी चित्रपट गीतांमधील अभिजाततेचे प्रतीक असल्याचे नमूद करत लेखक त्यामागील कारणे समर्पक रसग्रहणातून स्पष्ट करतो. गंगाधर महांबरे यांच्या लेखणीतून उतरलेले ‘सोबती’ चित्रपटातील ‘पाण्यातले पाता प्रतिबिंब हासणारे’ हे गीत असो, ‘लक्ष्मीची पाऊले’ चित्रपटातील सुधीर मोघे लिखित ‘ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने’ हे गीत असे; त्यातील सौंदर्यस्थळांचा मागोवा लेखक घेतो. ‘वारा गाई गाणे’ (जगदीश खेबुडकर-हृदयनाथ मंगेशकर),  ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ (सुरेश भट-हृदयनाथ मंगेशकर), ‘निंबोणीच्या झाडामागे’ (मधुसूदन कालेलकर-एन. दत्ता), ‘धुंद मधुमती रात रे’ (ग. दि. माडगूळकर-मास्टर कृष्णराव), ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ (ना. धों. महानोर-हृदयनाथ मंगेशकर) अशा एकापेक्षा एक सरस गीतांचा वेध घेतो. श्रीनिवास खळे यांनी बांधलेली ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या गाण्याची चाल म्हणजे एक कांचन सुरावट असल्याचे लेखक नमूद करतो.  अनेकदा ऐकलेल्या गाण्याकडे नव्या दृष्टीने पाहण्यास उद्युक्त करणारे मार्मिक रसग्रहण हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे. अविनाश कुंभार यांचे मुखपृष्ठ वेधक.

धुंदी कळ्यांना

लेखक : मार्तंड औघडे

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

पृष्ठे : 200; किंमत : रु. ३२५

[email protected]

Comments are closed.