25 जानेवारीपासून डिजिटल जनगणना

दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जारी : 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार प्रक्रिया

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2027 च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. हा टप्पा 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पार पडेल. या काळात लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी गणक घरोघरी भेट देतील. या जनगणनेत एकूण 40 प्रश्न विचारले जातील. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांच्या अधिसूचनेनुसार, जनगणनेसाठी संदर्भ तारीख 1 मार्च 2027 रोजी मध्यरात्री 12 वाजता निश्चित करण्यात आली आहे.

ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल. लोकांना घरबसल्या ऑनलाइन स्व-गणना करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. हे पोर्टल 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2027 पर्यंत खुले राहील. विशेष म्हणजे, सुमारे 95 वर्षांनंतर देशातील सर्व जातींची ही पहिलीच व्यापक जनगणना आहे. यापूर्वी सर्व जातींची जनगणना 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीत करण्यात आली होती.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, जानेवारी-फेब्रुवारी 2027 च्या जनगणनेच्या वेळापत्रकातून काही राज्ये आणि प्रदेश वगळण्यात आले आहेत. यामध्ये मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2027 च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे कारण सांगितले जात आहे. याशिवाय, लडाख आणि जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे असंतुलित झालेले भाग देखील या वेळापत्रकाअंतर्गत जनगणनेत समाविष्ट केले जाणार नाहीत.

Comments are closed.