अनंत सिंग यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश

1 डिसेंबरपर्यंत मुदत : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोकामाचे आमदार अनंत सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांना 1 डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करून तुरुंगात परतण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुलारचंद यादव हत्या प्रकरणात हा निकाल दिला आहे. दुलारचंद यांचे नातू नीरज कुमार यांनी पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अनंत सिंगला आत्मसमर्पण करण्याचा आदेश देतानाच बिहार सरकारला चार महिन्यांत तपास पूर्ण करण्यास सांगितले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील सुनावणी होईल. यापूर्वी मागील सुनावणीच्या दिवशी, न्यायालयाने संबंधित पक्षांना 30 ऑक्टोबर रोजी कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असे निर्देश दिले होते.

अनंत सिंग हा दुलारचंद यादव हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. गेल्या वर्षी बिहार निवडणुकीदरम्यान दुलारचंद यादव यांची हत्या झाली होती. दुलारचंद हे बिहार निवडणुकीत जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार पियुष प्रियदर्शी यांच्यासाठी प्रचार करत होते. यावेळी, त्यांचे आणि अनंत सिंग यांचे ताफे एकमेकांसमोर आल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. यादरम्यान गोळीबार झाला. या गोळीबारात दुलारचंद यांचा मृत्यू झाला होता.

Comments are closed.