IPLमुळे जसप्रीत बुमराहची फिटनेस झाली खराब? माजी दिग्गजांचा BCCI अन् मुंबई इंडियन्सवर थेट आरोप
Dilip Vengsarkar on Jasprit Bumrah Workload : सध्या भारतीय क्रिकेट संघात वर्कलोड मॅनेजमेंटवर मोठी चर्चा सुरू आहे, आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटीच्या मालिकेत बुमराह फक्त तीन सामन्यांमध्येच खेळला. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. अनेक माजी क्रिकेटपटूंना वाटते की बुमराहने (Jasprit Bumrah) या दौऱ्यात सर्व सामने खेळायला हवे होते. आता माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही बुमराहच्या वर्कलोडबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
वेंगसरकर यांचे मत आहे की, वर्कलोडमुळे बुमराहला दोन सामने बाहेर बसवणे चुकीचा निर्णय होता. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर बीसीसीआयने बुमराहला आयपीएल 2025 खेळण्यापासून रोखले असते, तर वर्कलोड मॅनेजमेंटची गरजच पडली नसती. हा त्यांचा थेट आरोप आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे, कारण बुमराह आयपीएलमध्येही दुखापतीतून सावरत मैदानात उतरला होता.
बीसीसीआय जबाबदार
‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या दृष्टीने बीसीसीआय, निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने त्याला आयपीएल 2025 मधून बाहेर राहण्यासाठी सांगायला हवे होते, पण तसे झाले नाही. तो पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नव्हता, तरीही आयपीएल खेळायला उतरला.”
ते पुढे म्हणाले की, ‘जर मी मुख्य निवडकर्ता असतो, तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि बुमराह दोघांनाही पटवून दिले असते की त्याने आयपीएल टाळावे. कारण इंग्लंड मालिकेसाठी त्याचे फिट राहणे अत्यंत गरजेचे होते. आयपीएलमध्ये केलेले धावा-गोलंदाजी कोण आठवून ठेवतो? पण या मालिकेत मोहम्मद सिराजची उत्कृष्ट गोलंदाजी, शुभमन गिल, के.एल. राहुल, यशस्वी जैसवाल, ऋषभ पंत यांची चमकदार फलंदाजी आणि वॉशिंग्टन सुंदरचे ऑलराउंड प्रदर्शन मात्र लोकांना नक्की आठवेल.”
आशिया कप 2025 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार का?
यंदा आशिया कप 2025 युएईमध्ये होणार आहे आणि तेथील खेळपट्ट्या आणि सहा महिन्यांनंतर होणारा टी-20 वर्ल्ड कप पाहता, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह महत्त्वाचा खेळाडू असू शकतो. पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता. वेगवेगळ्या फॉरमॅटमधील कामाचा ताण लक्षात घेता दोन्ही गोलंदाजांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्यात आले आहे आणि निवड बैठकीपूर्वी त्यांचे फिटनेस मूल्यांकन होण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.