सायबर फसवणुकीविरोधात थेट 'एफआयआर' स्ट्राइक

दूरसंचार विभागाच्या नवीन प्रणालीमुळे 5,000 कोटींची फसवणूक टळली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सायबर फसवणुकीबाबत सरकारकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सायबर फसवणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सायबर हल्लेखोरांनी कोणाच्याही खात्यातून एकदा पैसे काढले की ते लगेच अन्य खात्यांमध्ये हस्तांतरित केले जात असल्यामुळे रक्कम परत मिळवणे कठीण होते. हा धोका लवकर ओळखण्यासाठी दूरसंचार विभागाने फायनान्शियल ‘फ्रॉड रिस्क इंडिकेटर’ (‘एफआरआय’) प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे गेल्या वर्षभरात 5,043 कोटींची संभाव्य फसवणूक रोखण्यास मदत झाली आहे.

फायनान्शियल ‘फ्रॉड रिस्क इंडिकेटर’ने सुरू झाल्याच्या अवघ्या 15 महिन्यांत देशात 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या संभाव्य सायबर फसवणुकीला प्रतिबंध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, 22 मे 2025 रोजी सुरू करण्यात आलेल्या या यंत्रणेने ऑगस्ट 2026 पर्यंत एकूण 5,043.73 कोटींचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळले आहे. एप्रिल 2026 ते ऑगस्ट 2026 या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत 2,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची संभाव्य सायबर फसवणूक रोखण्यात आली. विभागाच्या मते ही रक्कम नागरिकांच्या खात्यातून बाहेर जाण्यापूर्वीच वाचवण्यात आल्यामुळे नंतर तिचा शोध घेण्याची, ती गोठवण्याची किंवा परत मिळवण्याची गरज नाहीशी झाली.

‘एफआरआय’ ही प्रणाली दूरसंचार विभागाच्या ‘डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म’द्वारे चालते. ही प्रणाली मोबाईल नंबर सायबर फसवणुकीत सामील होण्याचा धोका दर्शवते. तसेच या नंबरचे मध्यम, उच्च किंवा अति उच्च धोका असे वर्गीकरण केले जाते. ‘एफआरआय’चा मुख्य उद्देश फसवणुकीनंतर पैसे परत मिळवणे हा नसून खात्यातून पैसे बाहेर जाण्यापासून रोखणे हा आहे. बँका आणि यूपीआय व्यतिरिक्त डिमॅट, विमा आणि पेन्शन खात्यांशी संबंधित फसवणुकीसाठी देखील ही प्रणाली वापरण्याची योजना आहे.

ही प्रणाली ‘संचार साथी’वरील नागरिकांच्या तक्रारी, सायबर क्राईम पोर्टल्स, टेलिकॉम कंपन्या, बँका आणि इतर संस्थांकडून मिळणारे संकेत विचारात घेते. ही प्रणाली एका सेकंदापेक्षा कमी वेळात धोक्याचे मूल्यांकन करू शकते. जर धोका जास्त असेल, तर व्यवहार थांबवला जाऊ शकतो किंवा इशारा दिला जाऊ शकतो.  बँका या अलर्टच्या आधारावर रक्कम ट्रान्स्फर करण्याचा निर्णय रोखू शकतात.

Comments are closed.