आमचा विरोध नाही; आमची भूमिका सहकार्याची आहे!

‘ब्रिक्स’ कोणाच्याही विरोधात नसल्याची घोषणा : ‘भारत मंडपम’च्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत मंडपम येथे सुरू झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत यजमान भारताने जागतिक नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करतानाच संयुक्त निवेदनावर सर्वसहमती बनविण्यात मोठे यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 12 सप्टेंबर रोजी सदस्य देशांचे हार्दिक स्वागत करून औपचारिकपणे शिखर परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी आपल्या भाषणात त्यांनी ‘ब्रिक्स’ हा गट कोणाच्याही विरोधात नाही, उलट सर्वांचा आदर करण्याचा प्रयत्न करतो असे नमूद केले. आमची भूमिका सहकार्याची असून सर्वांना सोबत घेऊन जाणे हाच उद्देश असल्याचे यजमान भारताने जाहीर केले.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद ‘लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ या संकल्पनेवर आधारित असून ते पंतप्रधान मोदींच्या ‘मानवता प्रथम’ या भावनेवर आधारित लोककेंद्रित दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने शिखर परिषदेला सुरुवात झाली. गेल्या 20 वर्षांतील ब्रिक्सच्या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघटनेने आपली एकता आणि एकमत जागतिक स्तरावर ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुढील 20 वर्षांसाठी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तयार करण्याची आणि जागतिक प्रशासनात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.

ब्रिक्स सहकार्य केवळ सरकारांपुरते मर्यादित न राहता सामान्य लोकांशीही जोडले जावे, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या उद्देशाने 350 हून अधिक बैठका घेण्यात आल्या आणि सुमारे 30 शहरांमध्ये सदस्य देशांच्या पथकांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व सदस्य देशांचे आभार मानले. या वर्षीची शिखर परिषद ऐतिहासिक आहे, कारण ब्रिक्स आपला 20 वा वर्धापन दिन साजरा करत असल्याचे ते म्हणाले. भारतात तुम्हा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करताना मला अत्यंत आनंद होत आहे, असेही शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.

आम्ही कोणाच्याही विरोधात नाही

ब्रिक्सचे सार स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ब्रिक्सदेखील आपल्या ‘प्रौढत्वाच्या’ टप्प्यावर आहे. गेल्या 20 वर्षांत, ब्रिक्सने जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करत समर्पणाने पुढे वाटचाल करतो. आम्ही कोणाच्याही विरोधात न जाता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या मानसिकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

20 वर्षांचा रोडमॅप बनवण्याचा आग्रह

पुढील 20 वर्षांच्या रोडमॅपबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रिक्समधील आपली एकता आणि एकमत जागतिक स्तरावर ठोस परिणामांमध्ये रुपांतरित करण्याची हीच वेळ आहे. पुढील 20 वर्षांसाठी, आपण एका नवीन आणि महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर काम केले पाहिजे. आपण आपल्या स्वत:च्या कार्यप्रणालीपासून सुरुवात केली पाहिजे. ब्रिक्सचे अध्यक्षपद दरवर्षी बदलते, परंतु यामुळे आपली संस्थात्मक गती थांबता कामा नये. मी ब्रिक्स ‘सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणे’चा प्रस्ताव मांडतो. याअंतर्गत, सर्व उपक्रम आणि परिणामांचा पाठपुरावा केला जाऊ शकतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पश्चिम आशियामध्ये शांतता राखण्यात चीन योग्य भूमिका बजावण्यासाठी तयार

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यात आपली योग्य भूमिका बजावण्यासाठी चीन इतर ब्रिक्स सदस्य देशांसोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे शी जिनपिंग यांनी सांगितले. या  युद्धामुळे संपूर्ण प्रदेशातील लोकांचे गंभीर नुकसान झाले आहे आणि ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समान हिताशी सुसंगत नाही. या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी चीन इतर ब्रिक्स सदस्य देशांसोबत सहकार्य करण्यास तयार आहे, अशी हमी शी जिनपिंग यांनी दर्शवली.

Comments are closed.