यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘या’ वेळेत ट्रेडिंग सुरु असणार, जाणून
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेलं तेजीचं चित्र आजही कायम आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 मध्ये तेजी पाहायला मिळाली. उद्या लक्ष्मीपुजनाच्या निमित्तानं एनएसई आणि बीएसईवर मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात आलं आहे. यंदाचं मुहूर्त ट्रेडिंग नव्या वेळेत होणार आहे. गतवर्षी मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी आयोजित करण्यात आलं होतं. यंदा मुहूर्त ट्रेडिंग उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरला 1.45 मिनिटांनी सुरु होईल. हे सत्र 2.45 वाजेपर्यंत सुरु असेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केलं जाईल तर शेअर बाजाराला 22 ऑक्टोबरला बालिप्रतिपदा म्हणजेच पाडव्यानिमित्त सुट्टी असेल.
Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंगचं वेळापत्रक
दिवाळीनिमित्त आयोजित केलं जाणारं मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबरला दुपारी 1.45 ते 2.45 वाजता या दरम्यान होणार आहे. मुहूर्त ट्रेडिंग 1 तास सुरु राहील. तर, त्यापूर्वी 1.30 ते 1.45 वाजेपर्यंत प्री- ओपन सत्र सुरु असेल. या कालावधीत ट्रेडर्स ट्रेडिंगची तयारी कु शकतात. हे सत्र गुंतवणूकदारांसाठी शुभ सत्र मानलं जातं. गुंतवणूकदार या ट्रेडिंगकडे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समृद्धी आणि यश मिळवण्याची संधी म्हणून पाहतात. 2012 मध्ये देखील मुहूर्त ट्रेडिंग दुपारी 3.45 ते 5.00 वाजता आयोजित करण्यात आलं होतं.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसईवर गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग सत्र सायंकाळी 6.00 वाजता आयोजित केलं होतं. यंदा 21 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या दुपारी पावणे दोनला मुहूर्त ट्रेडिंग सुरु होईल ते पावणे तीन पर्यंत सुरु राहील. भारतीय शेअर बाजारात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र आयोजित केलं जातं. मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजतर्फे पहिल्यांदा करण्यात आली होती. ही सुरुवात 1957 ला झाली होती.
दिवाळीच्या निमित्तानं हिंदू आर्थिक नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी करण्यात येत असलेली गुंतवणूक चांगली मानली जाते. काही गुंतवणूकदार या दिवशी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन शेअर खरेदी करतात.
बीएसईवर 1957 पासून मुहूर्त ट्रेडिंगचं विशेष सत्र आयोजित केलं जातं. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1992 पासून मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र आयोजित करण्यात येत आहे.
गेल्या 10 वर्षांमधील मुहूर्त ट्रेडिंग पाहिलं असता निफ्टी 50 मध्ये 10 पैकी 8 वेळा तेजी पाहायला मिळाली आहे. तर, केवळ 2 वेळा निफ्टी 50 घसरणीसह बंद झाला. याचा अर्थ मुहूर्त ट्रेडिंगमध्ये बाजार सकारात्मक राहिला आहे. 2016 आणि 2017 मध्ये निफ्टी 50 मध्ये घसरण झाली होती.
भारतीय शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये 20 ऑक्टोबरला 411.18 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आज 84363.37 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 133.30 अंकांच्या तेजीसह 25843.15 अंकांवर बंद झाला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.