डॅाक्टर मारहाण प्रकरण! शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंसह तिघांना 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
Dombivli Doctor assault case : डोंबिवलीतील (Dombivli) शास्त्रीनगर रुग्णालयात एका नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याने, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या गंभीर प्रकरणी नगरसेवकासह चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
रमेश म्हात्रे यांना पक्षाने पाठवली कारणे दाखवा नोटीस
रमेश म्हात्रे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॅाक्टर मारहाण प्रकरणी तुमच्यावर पक्षाने कारवाई का करु नये, अशी विचारणा रमेश म्हात्रे यांना पक्षाने केली आहे. रमेश म्हात्रे सह अन्य तिघांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दर सहा तासांनी वैद्यकीय तपासणी करा आणि गोळ्या औषधाची गरज असल्याने न्यायालयाकडे एक दिवसाची पोलीस कोठडी द्या असे सांगितले. मात्र न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांना आरोपी रमेश म्हात्रे याला गोळ्या औषधाची गरज असल्याने तब्येत खराब झाल्यास दर सहा तासांनी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी पोलिसांना न्यायालयाने सूचना दिली आहेत.
Ramesh Mhatre: शिवीगाळ सहन न झाल्याने डॉक्टरांचे राजीनामे
रमेश म्हात्रेच्या अश्लील शिवीगाळीचा धक्का सहन न झाल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके यांनी तडकाफडकी आपला राजीनामा दिला आहे. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी या घटनेने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे.
रमेश म्हात्रेवर हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल
डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले ‘बाहुबली’ राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ‘बाहुबली’ म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत.
Comments are closed.