Ratnagiri News – सह्याद्रीच्या कुशीतील तिवडीचा २० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मार्गी ; वन विभाग आणि सीएसआरच्या प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि नागपूर येथील खाजगी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या संयुक्त प्रयत्नातून गावातील ऐतिहासिक पाणी कुंड (तळी) पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे तिवडी गावातील ग्रामस्थांची वर्षानुवर्षांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार असून, गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तिवडी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती. गावकऱ्यांना, विशेषतः वृद्ध आणि महिलांना पिण्याचे पाणी व इतर वापरासाठी सह्याद्रीचा कठीण डोंगर उतरून आजूबाजूच्या गावांमध्ये पायपीट करावी लागत असे. कडक उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होऊन गावाला टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. गावात ‘तळी’ नावाचे एक ऐतिहासिक नैसर्गिक झऱ्याचे पाणी असलेले कुंड होते. मात्र, २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये या कुंडाचे बांधकाम पूर्णपणे ढासळल्याने गावाचा पाण्याचा एकमेव स्रोत बंद झाला होता. हे कुंड वनक्षेत्रात येत असले तरी, जागेची मालकी खाजगी असल्याने शासकीय निधी मिळवण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या.

या समस्येची दखल घेत गावाचे माजी सरपंच प्रकाश पवार यांनी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांच्याकडे विशेष मदतीसाठी पाठपुरावा केला. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय निधीच्या मर्यादांवर पर्याय शोधला. त्यांनी नागपूर येथील ‘लॉईड्स मेटल एनर्जी अँड ऋषभ मेटा इस्पात प्रा. लि.’ या कंपनीकडे सीएसआर अंतर्गत या कुंडाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला. कंपनीच्या प्रतिनिधी इंद्रायणी यांनी गावकऱ्यांची निकड पाहून तात्काळ १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. नुकत्याच आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा निधी सुपूर्द करण्यात आला असून, या कामामुळे तिवडी गावाची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे.

Comments are closed.