डोंबिवलीचे पोलीस नांदेडमध्ये बनले शेतमजूर; मित्राची हत्या करून फरार झालेला मारेकरी अडीच वर्षांनंतर जेरबंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पेगवर पेग रिचवल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून मित्राची निघृण हत्या करून अडीच वर्षे फरार झालेल्या मारेकऱ्याच्या डोंबिवली पोलिसांनी फिल्मी स्टाईल मुसक्या आवळल्या आहेत. खबऱ्याकडून माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांच्या पथकाने शेतमजूर बनून नांदेड गाठले. तेथे तब्बल पाच दिवस कधी या शेतात कधी त्या शेतात मजुरी करून आरोपीचा छडा लावला आणि ओळख लपवणाऱ्या दीपक करगडे (४०) या आरोपीचा खेळ खल्लास केला.

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा खाडीकिनारी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सोमनाथ शिंदे या रिक्षाचालकाची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली होती. दारू पार्टीदरम्यान किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी यापूर्वी विलन ठावरे (४१) आणि योगेश डोंगरे (४२) या दोघांना अटक केली होती. मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा दीपक करकडे (४०) हा घटनेनंतर अडीच वर्षे फरार झाला होता.

ओळख पटताच मुसक्या आवळल्या

कोणताही डिजिटल पुरावा किंवा मोबाईल लोकेशन नसताना केवळ गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड गाठले. आरोपी ज्या परिसरात लपून राहत होता, त्या ठिकाणी पोलिसांनी तब्बल पाच दिवस शेतमजुराचा वेश धारण करून वास्तव्य केले. शेतात मजुरी करणाऱ्या कामगारांमध्ये मिसळून पोलिसांनी आरोपीची खात्रीशीर ओळख पटवली आणि योग्य संधी साधत त्याला शुक्रवारी जेरबंद केले.

ना मोबाईल ना ओळखपत्र

ओळख लपवण्यासाठी त्याने कोणतेही ओळखपत्र जवळ ठेवले नव्हते. तसेच पोलिसांना तांत्रिक सुगावा लागू नये म्हणून मोबाईलचाही वापर टाळला होता. तो नांदेडमधील एका शेतात मजूर म्हणून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपासाला वेग आला. कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि पोलीस निरीक्षक जी. गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Comments are closed.