ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात ‘या’ कंपन्यांचे स्टॉक क्रॅश, गुंतवणूकदारांचा विक्रीचा धडाका
मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज औषध कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. भारतातील औषध कंपन्यांच्या स्टॉक्समधील घसरणीचं कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक आदेश आहे. निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये 1.4 टक्के घसरण पाहायला मिळाली. ल्यूपिनमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. हा स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला. अरबिंदो फार्माचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला. सिप्लाचा स्टॉक 2 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. सन फार्मा कंपनीचा स्टॉक 1.9 टक्क्यांनी घसरला. बायोकॉनचा स्टॉकदेखील 0.3 टक्क्यांनी घसरला. या सर्व कपंन्यांचे स्टॉक घसरण्याचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशात औषधांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयावर सही केली आहे. या निर्णयाद्वारे अमेरिकेत देशांतर्गत औषधांचं उत्पन्न वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे. यामुळं भारतीय औषध निर्यातदारांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला औषधं निर्यात करतात. निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. ल्यूपिन, अरबिंदो फार्मा आणि सिप्ला सारख्या कंपन्यांचे स्टॉक्स घसरले.
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ उतार पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स बाजार सुरु झाला तेव्हा 100 अंकांनी घसरला होता. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 155.77 अंकांनी घसरुन 80641.07 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये देखील किरकोळ घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी 50 निर्देशांक 24379.60 अंकांवर बंद झाला. टायटन, सन फार्मा, इटर्नल, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर घसरले. तर, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, नेस्ले, हिंदुस्थान यूनिलीवर आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी चित्रपटांवर देखील 100 टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक पोस्टमध्ये म्हटलं की, आमच्या देशात येणाऱ्या विदेशात तयार झालेल्या चित्रपटावर 100 टक्के शुल्क आकरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ते म्हणाले, अमेरिकेत चित्रपट उद्योग वेगानं संपत चाललाय. इतर देश चित्रपट निर्माते आणि स्टुडिओजना अमेरिकेपासून दूर करण्यास प्रोत्साहन देत आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Comments are closed.