रुपयाची घसरगुंडी सुरूच, डॉलरच्या तुलनेत ९५.८६ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर
आजचा दिवस हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेसाठी आणि सर्वसामान्यांच्या खिशासाठी अत्यंत जड ठरला आहे. एकीकडे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर दुसरीकडे हिंदुस्थानी रुपया डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आंतरबँकिंग परकीय चलन बाजारात रुपयाने ९६ प्रति डॉलरचा टप्पा ओलांडला आणि अखेर ९५.८६ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला.
इराण युद्धाचा धोका वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ रुपयाच्या घसरणीला कारणीभूत ठरली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या सहा व्यापारी सत्रांमध्ये रुपयात जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली असून, या वर्षात आतापर्यंत रुपया ६ टक्क्यांहून अधिक कमकुवत झाला आहे. अमेरिकेतील किरकोळ विक्रीची मजबूत आकडेवारी आणि स्थिर कामगार बाजारामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी झाल्याने डॉलर इंडेक्स वधारला आहे, ज्याचा परिणाम रुपयावर झाला आहे.
परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक अनिश्चितता आणि भांडवली प्रवाहातील घट यामुळे रुपयावर दबाव आहे. तसेच वाढत्या तेलाच्या किमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Comments are closed.