Mumbai News – मुंबई विमानतळावर 7 कोटींचे कोकेन जप्त, दक्षिण आफ्रिकी नागरिकासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमली पदार्थांविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) मोठे यश आले आहे. डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 7 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी दक्षिण आफ्रिकी नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. जेझिल लुवाडो कॅस्टेलानो आणि आणि आरिफ दाऊद पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपी कॅस्टेलानो हा नैरोबीहून मुंबई विमानतळावर दाखल होताच संशयावरून, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अडवले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले.

कॅस्टेलानोच्या सामानाची झडती घेतली असता, अधिकाऱ्यांना 1,426 ग्रॅम कोकेनसह इतर काही अमली पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत सुमारे 7 कोटी रुपये इतकी आहे. ही खेप त्याला दुसरा आरोपी आरिफ पटेल याच्याकडे पोहचवायची होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी आरिफ पटेल याला मुंबईतील नळ बाजार परिसरातून ताब्यात घेतले. तपासादरम्यान गुन्ह्यात आरिफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींना रीतसर अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

Comments are closed.