ड्रग माफिया वीरेंद्र बैसोया याचे दुबईतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले

6,000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

ड्रग्ज सिंडिकेटचा एक प्रमुख माफिया विरेंद्र बैसोया याला शुक्रवारी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक 4310 ने दुबईतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. एनसीबीने विरेंद्रविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर त्याला दुबईत अटक करण्यात आली. आता भारत सरकारच्या पुढाकाराने त्याला प्रत्यार्पित करण्यात आले. विरेंद्र हा दिल्ली पोलिसांच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनियाचा निकटवर्तीय असून तो 6,000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातही आरोपी आहे. ड्रग्जविरोधात भारत सरकारसाठी हे एक मोठे यश आहे. तथापि, मुख्य आरोपी संदीप धुनिया दुबईतून पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याने तो पोलिसांच्या तावडीतून तूर्तास सुटला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी विरेंद्रच्या अटकेसंदर्भात इंस्टाग्रामवरून माहिती दिली. मोदी सरकार परदेशात लपलेल्या अमली पदार्थ तस्करांचा अथकपणे मागोवा घेत असून त्यांची संपूर्ण व्यवस्था निर्दयपणे नष्ट करत आहे. अमली पदार्थांविरोधातील आमच्या शून्य-सहिष्णुता धोरणात एक नवीन मैलाचा दगड गाठत, एनसीबीने फरार अमली पदार्थ तस्कर विरेंद्र बैसोया याला यूएईमधून यशस्वीरित्या परत आणल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अमली पदार्थ तस्कीरीतील गुन्हेगारांचा मागोवा घेऊन आमच्या यंत्रणांनी पुन्हा एकदा भारतीय कायद्यापासून कोणीही सुटणार नसल्याचे जगाला दाखवून दिल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Comments are closed.