3,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

5 पाकिस्तान्यांना अटक, भर समुद्रात कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुजरात दहशतवादविरोधी दल आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरात सागरतटानजीक 3 हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असून पाच पाकिस्तान्यांना अटक करण्यात आली आहे. हे अंमली पदार्थ एका इराणी नौकेतून भारतात आणण्यात येत होते. हस्तगत करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे वजन 526 किलोग्राम असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत किमान 3 हजार कोटी रुपये असल्याची माहिती दिली गेली आहे. ही माहिती भारतीय तटरक्षक दलाकडून बुधवारी दिली गेली आहे.

इराणी नौकेतून हे अंमली पदार्थ आणण्यात येत आहेत, याची अचूक माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर या नौकेवर समुद्री नौका आणि विमाने यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते. तटरक्षक दलाच्या नौकांनी सातत्याने या नौकेचा पाठलाग चालविला होता. ही घटना 25 सप्टेंबरची आहे. अंमली पदार्थ वाहून नेणाऱ्या नौकेला चारी बाजूंनी घेरण्यात आले आणि नौका ताब्यात घेण्यात आली. नौकेत असणारे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आणि त्यांचे परीक्षण करण्यात आले. हेरॉईल आणि मेथामेंथेटामाईन प्रकारचे हे अंमली पदार्थ आहेत. नाव चालविणाऱ्या 5 पाकिस्तानी नागरीकांना अटक करण्यात आली असून त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांची चौकशी मुंबईत होणार आहे.

मुंबईला पाठवणी

जप्त करण्यात आलेली नाव, अंमली पदार्थ आणि अटक करण्यात आलेले 5 पाकिस्तानी नागरीक यांची त्वरित मुंबईला पाठवणी करण्यात आली आहे. मुंबईत या प्रकरणाचे तपासकार्य केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांकडून संयुक्तरित्या केली जाणार आहे. या अंमली पदार्थांच्या वाहतुकीत एका नायजेरियन नागरीकाचाही हात आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. गुप्तचरांनी दिलेली माहिती प्रथम गुजरातच्या दहशतवादविरोधी दलाला प्राप्त झाली होती. हे अंमली पदार्थ तामिळनाडूतील एका मध्यस्थाला दिले जाणार होते, अशी माहिती देण्यात आली.

आधीच काही किंमत चुकती

या अंमली पदार्थांची काही रक्कम पाकिस्तानी मध्यस्थाला आधीच चुकती करण्यात आली आहे. उरलेली रक्कम खेप प्राप्त झाल्यानंतर देण्यात येणार होती. रकमेचा व्यवहार हवाला वाहिन्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. यावेळी वाहतूक होत असलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण खूपच मोठे असल्याने मोठे कारस्थान अत्यंत गुप्तपणे रचण्यात आले होते, असेही आता दिसून येत आहे.

हाजी सलीम याचा ‘माल’

भारताबाहेर राहून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करणारा कुख्यात तस्कर आणि दहशतवादी हाजी सलीम याने हे अंमली पदार्थ मागविले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात हाती लागली आहे. या कारस्थानाचा सूत्रधारही सलीम हाच आहे. त्यानेच ‘आझाद’ नामक इराणी नौकेची निवड केली होती. तथापि, त्याची योजना पूर्ण फसली आहे. नौकेचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी अत्याधुनिक संपर्क उपकरणांचा उपयोग केला जात होता. तरीही भारताच्या गुप्तचरांनी अचूकपणे ही माहिती मिळवून हा कट उधळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या यशस्वी कारवाईत सहभागी असणाऱ्या सर्व सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे.

कोणते अंमली पदार्थ…

हस्तगत करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये जवळपास 400 किलो मेथामेथेंटामाईन आणि 126 किलोग्राम उच्च प्रतीचे हेरॉईन यांचा समावेश आहे. या प्रकरणात एफआयआर सादर करण्यात आला असून सखोल चौकशी केली जाणार आहे. या कटाची पाळेमुळे उखणून काढण्याचा यंत्रणांनी निर्धार केला आहे.

गुप्तचरांच्या अचूक माहितीमुळे

ड गुप्तचर संस्थांनी अचूक माहिती दिल्यामुळे मोठे कारस्थान झाले उध्वस्त

ड गुजरात दहशतवादविरोधी दल आणि तटरक्षक दल यांची संयुक्त कारवाई

ड मुंबईत होणार चौकशी, कटाचा सूत्रधार हाजी सलीम हा असल्याचे उघड

Comments are closed.