पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार हाशिम मुसाचा खात्मा.
पाकिस्तानी दहशतवादी चकमकीत ठार : 20 लाख रुपयांचे होते इनाम
न्यूजपेपर सोसायटी, श्रीनगर
सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आसिफ उर्फ हाशिम मूसा या पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. मूसा 2025 च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील होता आणि तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता. एका सुरक्षा अभियानादरम्यान हाशिम मूसा मारला गेला आहे. बडगामच्या पलमैदान भागात शोधमोहिमेदरम्यान त्याच्या मृतदेहासोबत शस्त्रास्त्रsही हस्तगत झाली आहेत.
सैन्य आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी गुप्तचर माहिती मिळाल्यावर यूसमर्ग भागात ‘ऑपरेशन कोराग’ सुरू केले होते. या अभियानादरम्यान मूसाला कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.
सुरक्षा दलांना संयुक्त शोध मोहिमेदरम्यान संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना आव्हान दिल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला होता. ज्यानंतर झालेल्या चकमकीत मूसा मारला गेला. संबंधित परिसरात सुरक्षा दल आता इतर दहशतवाद्यांच्या उपस्थितीचा शोध घेणे आणि अतिरिक्त सामग्री हस्तगत करण्यासाठी तपास करत आहेत.
वाँटेड दहशतवादी
मूसा हा एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील मुख्य आरोपी होता. या हल्ल्यात 26 जणांची हत्या करण्यात आली होती आणि मृतांमध्ये प्रामुख्याने पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी नागरिक आणि एलईटीचे दहशतवादी आदिल हुसैन ठोकर, अली भाई आणि हाशिम मूसा यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.
पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रूपमध्ये पॅरा-कमांडो
मूसा हा पूर्वी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रूपमध्ये पॅरा-कमांडो म्हणून कार्यरत राहिला होता. 2022 मध्ये घुसखोरीद्वारे तो काश्मीर खोऱ्यात दाखल झाला होता. सुरक्षा यंत्रणांची नजर 2022 पासून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय एलईटीच्या 4 दहशतवाद्यांच्या समुहावर होती. यात जुनैद रमजान अहमद, अबू ताल्हा, यासिर आणि हाशिम मूसा सामील होते. जुनैद रमजान हा डिसेंबर 2024 मध्येच मारला गेला होता. त्याच्या मोबाइलमधून सुरक्षा दलांना या चारही जणांचे एक छायाचित्र मिळाले होते, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना ग्रूप आणि त्याच्या नेटवर्कची महत्त्वाची माहिती मिळाली होती. यानंतर ताल्हाला एप्रिल 2025 मध्ये कंठस्नान घालण्यात आले होते. 5 सप्टेंबरच्या ऑपरेशनमध्ये यासिर मारला गेला होता.
सप्टेंबरमध्ये 5 दहशतवादी
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि बडगाम जिल्ह्यात 1-30 सप्टेंबरदरम्यान 5 दहशतवादी मारले गेले आहेत. 5 सप्टेंबर रोजी बडगाम येथे यासिर या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. तर 17 सप्टेंबर रोजी उधमपूरमध्ये सद्दाम आणि मुस्तफा हे दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले होते. एका दहशतवाद्याचा सडलेला मृतदेह अलिकडेच सुरक्षा दलांना आढळून आला होता.
Comments are closed.