'ब्लू ड्रम' प्रकरणात मुस्कान आणि साहिल दोषी.
सौरभ राजपूतच्या हत्येचे प्रकरण : 15 दिवसांनी शिक्षेची घोषणा होणार
वृत्तसंस्था, मेरठ
उत्तरप्रदेशच्या मेरठ येथील बहुचर्चित ‘ब्ल्यू ड्रम’ हत्या प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांनी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिलला दोषी ठरविले आहे. या दोघांना न्यायालयाकडून 15 दिवसांनी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 3 मार्च 2025 रोजी मुस्कान आणि साहिलने सौरभ राजपूत यांची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये भरून त्यात सिमेंट ओतून सील केले होते.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुमारे 1 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यादरम्यान 126 वेळा सुनावणी पार पडली आणि 22 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले. दीर्घ सुनावणी आणि अंतिम युक्तिवादानंतर 19 सप्टेंबर रोजी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
सौरभ राजपूत हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी लंडन येथून मेरठमध्ये स्वत:च्या घरी परतला होता. तर 28 फेब्रुवारी रोजी सौरभने पत्नी मुस्कानसोबत मिळून स्वत:ची मुलगी पीहूचा वाढदिवस साजरा केला होता. 3 मार्च रोजी मुस्कानने पती सौरभच्या जेवणात झोपेचे औषध मिसळले आणि त्यानंतर प्रियकर साहिल शुक्लाला फोन करून घरी बोलाविले. दोघांनी सौरभची हत्या करत त्याच्या मृतदेहाचे चार तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये पॅक करून ठेवले होते.
4 मार्च रोजी मुस्कान मुलगी पीहूला स्वत:च्या आईच्या घरी सोडून साहिलसोबत हिमाचल प्रदेशात गेली होती. यानंतर 17 मार्च रोजी मुस्कान हिमाचलमधून परतली आणि माहेरी पोहोचून तिने स्वत:च्या आईवडिलांना पती सौरभच्या हत्येविषयी सांगितले होते. 18 मार्च रोजी पोलिसांनी इंद्रानगर येथील घरी जात शोध घेतला असता ड्रममध्ये सौरभचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी साहिल आणि मुस्कान यांना अटक केली होती.
Comments are closed.