IPL 2026: एकही चेंडू न टाकता आरसीबीची थेट फायनलमध्ये होईल एंट्री! आयपीएलचा 'हा' नियम गतविजेत्यांसाठी गेमचेंजर

आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२६ मध्ये मंगळवारपासून (२६ मे) प्लेऑफचे सामने सुरू आहेत. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैद्राबाद, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. यामधील पहिले दोन संघ आरसीबी आणि जीटी हे गुणतालिकेत अव्वल दोन स्थानावर असल्याने यांच्यात क्वालिफायर १ सामना खेळला जाणार आहे. धरमशालेत हे दोन संघ उद्या (२६ मे) भिडणार आहेत.

या सामन्यामधील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहोचतो, तर पराभूत झालेल्या संघाला एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी सामना करावा लागतो, हा सामना क्वालिफायर २ असून यामध्ये जो जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचणार.
जर लीग फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो. प्लेऑफचे सामने हे बाद फेरीचे असल्याने यासाठी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वेगळे नियम निश्चित केले आहेत. जर पूर्ण सामना खेळला गेला नाही, तर निकाल लागावा यासाठी प्रत्येक संघाला किमान ५ षटके खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. ही ५ षटके सुद्धा खेळली गेली नाही तर सामना रद्द होतो, कारण या प्लेऑफच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने राखीव दिवस नियम ठेवला नाही.

अशा स्थितीत प्लेऑफच्या सामना रद्द झाला तर आयपीएलच्या नियमांनुसार, गुणतालिकेत उत्तम स्थानी असलेल्या संघाला फायदा होतो. याचा अर्थ असा की, जर क्वालिफायर १ सामान रद्द झाला, तर आरसीबी थेट अंतिम फेरीत पोहोचेल, कारण ते लीग टप्प्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. तसेच जीटीला क्वालिफायर २ खेळावा लागेल.

आरसीबी विरुद्ध जीटी सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघामध्ये नेहमीच चुरशीची लढत झाली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकमेकांविरोधात ८ सामने खेळले असून प्रत्येकी ४-४ सामने जिंकले आहेत. चालू हंगामातही हे दोन संघ दोनदा समोरा-समोर आले आणि दोघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला. यामुळे क्वालिफायर १ सामन्यांत चाहत्यांना थरारक सामना पाहता येण्याची शक्यता आहे.

Comments are closed.