IPL 2026: रिझर्व्ह डे नसल्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार? जाणून घ्या सविस्तर

आयपीएल २०२६ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. गट टप्प्यातील ७० सामने संपले असून प्लेऑफचे चार संघ ठरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असून जेतेपदासाठी भिडतील. २६ मे पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार असून ३१ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. प्लेऑफच्या सामन्यांना राखीव दिवस नसून पावसाने सामन्यात व्यत्यय आणला तर सामन्याचा निकाल कसा लागणार, जाणून घेऊया.

गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्सविरूद्ध भिडताना दिसतील. हा सामना धरमशाला येथे खेळवला जाईल. यानंतर एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ सामने न्यू चंडीगढमध्ये खेळवले जातील, तर अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. क्वालिफायर १, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ साठी कोणतेही राखीव दिवस नाहीत.

आयपीएलच्या नियमांनुसार, पहिल्या तीन प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस नाहीत. मात्र, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला जाणार आहे. २०२३ च्या आयपीएलमध्येही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता आणि पावसामुळे राखीव दिवशी सामन्याचा निकाल लागला होता. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की: जर क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, तर निकाल कसे ठरतील?

खरं तर, क्वालिफायर-१, एलिमिनेटर किंवा क्वालिफायर-२ मधील कोणताही सामना पावसामुळे रद्द झाल्यास, राखीव दिवसाचा नियम लागू होत नाही. आता प्रश्न असा आहे की विजेता कसा घोषित केला जाईल आणि कोणता संघ पुढे जाईल. अशा परिस्थितीत, मागील फेरीतील गुणतालिकेतील स्थानाला प्राधान्य दिल जात. याचा अर्थ असा की, जर आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर आरसीबीला विजेता घोषित केलं जाईल.

कारण लीग टप्प्यानंतर आरसीबी अव्वल स्थानी राहिली आणि गुजरात दुसऱ्या स्थानी राहिली. त्याचप्रमाणे, जर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामना पावसामुळे रद्द झाला, तर गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेला राजस्थान संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस उपलब्ध असेल. जर अंतिम सामना ३१ मे रोजी होऊ शकला नाही, तर तो १ जून रोजी खेळवला जाईल.

Comments are closed.