अपघातातील गाडी विकण्यासाठी जान्हवी गडकरची हायकोर्टात धाव
ईस्टर्न फ्रीवेवर मद्यधुंद अवस्थेत बेफाम गाडी चालवून दोघांचा बळी घेणाऱ्या अॅड. जान्हवी गडकरला आता ही गाडी विकायची आहे. यासाठी तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्या. माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने गाडीचा ताबा माझ्याकडे दिला आहे. मी गाडीची दुरुस्ती केली आहे. आता मला ही ऑडी कार विकायची आहे. यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी नाकारली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार खटला प्रलंबित असताना गाडी विकता येते. त्यामुळे मलादेखील गाडी विकण्यास संमती द्यावी, असा युक्तिवाद गडकर यांनी केला.
न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात विमा कंपनीला गाडी विकण्यास परवानगी दिली आहे. तुमचे प्रकरण वेगळे आहे. या अपघातात दोघांचा बळी गेला आहे. असे असताना गाडी विकल्यास मूळ पुरावाच नष्ट होईल. परिणामी यासाठी परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. गाडीचा पंचनामा व अन्य पुरावे पोलिसांकडे शाबूत आहेत. गाडी विकल्याने काहीही फरक पडणार नाही, असे गडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यासंदर्भात अजून काही मुद्दे असल्यास ते सादर करावेत, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब केली.
काय आहे प्रकरण
9 जून 2015 रोजी ईस्टर्न फ्रीवेवर हा भयानक अपघात झाला. गडकरने दारू पिऊन विरुद्ध दिशेने गाडी चालवली व टॅक्सीला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. गडकर विरोधात याचे आरोपपत्र दाखल झाले आहे.
Comments are closed.