आमच्यासाठी ना पक्ष, ना कुणी विपक्ष, सर्वजण समकक्ष; मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयुक्त बोलले
नवी दिल्ली : आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून बिहारमध्ये (Bihar) मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार आरोप आणि निदर्शने सुरू आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज दुपारी 3 वाजता नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. बिहारमध्ये विशेष मतदारयादी सुधारणा (SIR) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाची (Election commission) ही पहिली पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेतून आयोगाने काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या (Rahul gandhi) आरोपावर सडेतोड उत्तर देत पलटवार केला. निवडणूक आयोगाचा ना कुठला पक्ष आहे, ना विपक्ष आहे, आयोग तर सर्वांसाठी समकक्ष आहे.. असे म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भूमिका मांडली.
निवडणूक वेळापत्रकाच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेणे तसं कमीच आहे. मात्र, राहुल गांधींकडून सातत्याने होत असलेल्या आरोपाने निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन झाली असून आयोग संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळेच, आज मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच, मतचोरी शब्दाला आक्षेप घेत राहुल गांधींनी कुठलेही पुरावे दिले नसल्याचा दावाही त्यांनी केलाय.
कायद्यानुसार, निवडणूक आयोगाकडील नोंदणीनंतरच एखाद्या राजकीय पक्षाचा जन्म होतो. त्यामुळे, निवडणूक आयोग कुठल्याही पक्षासोबत भेदभाव कसा करेल. निवडणूक आयोगासाठी ना कुठला पक्ष आहे, ना विपक्ष आहे, आयोगासाठी सर्वच पक्ष समकक्ष आहेत, असे आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले. गेल्या 20 वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष मतदान यादीत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. या मागणीचा विचार करुनच निवडणूक आयोगाने बिहारमधून एसआयआरची सुरुवात केल्याचं कुमार यांनी म्हटले.
मतचोरी शब्दाचा उल्लेख म्हणजे जनतेची दिशाभूल
राहुल गांधींकडून होत असलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरूनही आयोगाने पलटवार केला. कायद्यानुसार उचित वेळेत मतदारांकडून मतदान यादीतील त्रुटींची माहिती न मिळाल्यास, तसेच निवडणूक निकालानंतर 45 दिवसांत मतदारांकडून विजयी उमेदवाराबाबत आक्षेप घेत न्यायालयात निवडणूक संदर्भात याचिका दाखल न केल्यास, पुन्हा मत चोरीचा आरोप करणे योग्य नाही. मतचोरीसारख्या शब्दाचा प्रयोग करुन जनतेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. भारतीय संविधानाचा हा अपमान असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले.
#वॉच दिल्ली: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानश कुमार म्हणाले, “कायद्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म निवडणूक आयोगात नोंदणीतून झाला आहे, तर निवडणूक आयोग त्या राजकीय पक्षांमध्ये कसा भेदभाव करू शकेल. निवडणूक आयोगासाठी पक्ष किंवा विरोधी नाही, सर्व समान आहेत … शेवटचे दोन… शेवटचे दोन… pic.twitter.com/0TSSB4AZWP
– ani_hindinews (@ahindinews) 17 ऑगस्ट, 2025
राहुल गांधींना प्रतिज्ञा सादर करण्याचे चॅलेंज
दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदान डेटामध्ये फेरफार केल्याचा वारंवार आरोप केला आहे आणि महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुका आणि कर्नाटकमधील लोकसभा निवडणुका भाजपला जिंकवण्यासाठी ‘मत चोरी’ करण्यात आल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेलेल्या किंवा वगळल्या गेलेल्या लोकांची नावे स्वाक्षरी केलेल्या घोषणापत्रासह सादर करण्यास सांगितले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाहीत तर त्यांनी देशाची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, असेही आयोगाने म्हटले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.