फोडाफोडीच्या राजकारणावर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा दावा; म्हणाले
Eknath Khadse: जळगाव महापालिका निवडणुकीच्या (Jalgaon Municipal Election 2026) प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या भाषणाने राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. खडसेंनी आपल्या भाषणात भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde Faction) जोरदार हल्ला चढवत मोठा गौप्यस्फोट केलाय.
एकनाथ खडसे: “ओ सरकार वाफेचे सरकार”
एकनाथ खडसे म्हणाले, “आज राज्यात जे सरकार आहे ते चोर आणि उच्चक्यांचं सरकार आहे. सत्तेसाठी काहीही करायला हे लोक तयार आहेत. देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही सत्तेसाठी एकत्र आले आहेत.” भाजपवर टीका करताना खडसे म्हणाले की, “पहिल्यासारखी साफसूत्री भाजप आता उरलेली नाही. जळगावमध्ये भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे, ” असे त्यांनी म्हटले आहे. “जळगावमधला सगळा भ्रष्टाचार याच लोकांनी केला आहे. गटार खाल्ली, गटारमधलं खाल्लं. शहर लुटण्याचं काम या लोकांनी केलं,” असा गंभीर आरोप देखील एकनाथ खडसे यांनी केलाय.
Eknath Khadse: फोडाफोडीच्या राजकारणावर मोठा गौप्यस्फोट
खडसेंनी मागील पंचवार्षिक निवडणुकीतील फोडाफोडीच्या राजकारणाचा थेट खुलासा करताना सांगितले की, “जळगाव महापालिकेसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी मला स्वतः एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. ‘पालिकेच्या जागेसाठी काही करता येईल का? नगरसेवक फुटू शकतील का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला, ” असा दावा त्यांनी केलाय.
खडसे पुढे म्हणाले, “मी त्यांना सांगितलं, पाकीटे पाठवा, 30 ते 35 नगरसेवक फुटू शकतात. पण हा विषय कोणालाही सांगू नका, गुलाबराव पाटलांना तर मुळीच नाही. कारण गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचं चांगलं जमतं,” असे त्यांनी म्हटले. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फोडाफोडीचे राजकारण झालं, या विषयावर त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Eknath Khadse: आज काय राजकारण सुरू आहे? खडसेंचा सवाल
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना खडसे म्हणाले, “अजित पवार कधी शरद पवारांसोबत असतात, तर शिंदे काँग्रेस–राष्ट्रवादीसोबत असतात. हे काय राजकारण सुरू आहे?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर “लाडक्या बहिणीला पैसे दिले, पण भाई कसाई निघाला. पंधराशे रुपये दिले, पण त्याचवेळी राज्यात महागाई वाढवली,” असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय.
Eknath Khadse on BJP: एकनाथ खडसेंचा भाजपवर आरोप
“या महापालिका निवडणुकीत खुलेआम पैशांची पाकिटं वाटली जात आहेत आणि ही पाकिटं भाजपकडूनच येत आहेत,” असा आरोप देखील एकनाथ खडसे यांनी केलाय. एकनाथ खडसेंच्या या भाषणामुळे जळगाव महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि शिंदे गटावर केलेल्या आरोपांवर आता संबंधित नेते काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.