‘अल निनो’चा प्रभाव; मुरुडच्या समुद्रकिनाऱ्याकडे सीगल पक्ष्यांनी फिरवली पाठ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुरुडचा समुद्रकिनारा.. त्यात उसळणाऱ्या निळ्याशार लाटा.. मनमोहक वारा आणि सीगल पक्ष्यांनी टाकलेला डेरा यामुळे पर्यटकांची पाऊले आपसूकच येथे वळायची. पक्षीप्रेमींना तर जणू पर्वणीच. निसर्गाचे हे अनोखे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी विविध भागांतून पक्षीप्रेमी मुरुडच्या किनारी येतात. मात्र यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सीगल पक्ष्यांनी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. याबाबत पर्यावरण व पक्षीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

दरवर्षी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर लडाखमधून हजारो सीगल पक्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतात. समुद्रकिनारी असलेल्या राजवाड्याजवळ सकाळच्या प्रहरी थव्यांनी आकाशात झेपावणारे सीगल पक्षी पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. लाल भडक चोच, लाल पाय आणि पांढऱ्या शुभ्र पिसांनी वेढलेले शरीर असा या सीगल पक्ष्यांचा थाट असतो. लडाखमध्ये सध्या बर्फवृष्टी होत असल्याने पक्ष्यांना खाद्य मिळणे कठीण झाले आहे. शिवाय प्रजननासाठीदेखील तो परिसर अनुकूल नाही.

वातावरणात बदल

मुरुड-जंजिऱ्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील शांत वातावरण हे अनुकूल असल्याने असंख्य सीगल पक्षी येतात. येथील पाहुणचार घेतल्यानंतर हे पक्षी अंडी घालण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात मायदेशी परततात. विशेष म्हणजे लडाख ते कोकण हजारो किलोमीटरचे अंतर ते एकाच उड्डाणात पूर्ण करतात. मात्र यंदा समुद्रातील ‘अल निनों’च्या प्रभावामुळे वातावरणात बदल झाला. त्याचा परिणाम सीगल पक्ष्यांवरही होत असून यावर्षी या पाहुण्यांनी मुरुडच्या किनारी येणे टाळले आहे. नेहमी हे पक्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. पण अद्यापि त्यांचे आगमन झालेले नाही.

समुद्रात होणाऱ्या घडामोडीचा परिणाम सर्वच प्राणी व पक्ष्यांच्या जीवनावर झाला आहे. मुरुडला सीगल पक्षी यावर्षी का आले नाहीत, याचे नक्की कारण शोधावे लागेल. अलिबाग व इतर ठिकाणी सीगल पक्षी कमी प्रमाणात आले आहेत. समुद्रावरील सतत होणारी वर्दळ, ‘अल निनों’मुळे बदललेले वातावरण आणि पर्यटकांची गर्दी यामुळे कदाचित सीगल पक्ष्यांचे आगमन लांबले असावे.

प्रवीण कावळे, पक्षीमित्र, अलिबाग

Comments are closed.