महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये टोळीकडून लुटमार; साताऱ्यातील सालपे स्थानकाजवळील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱया महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पाच ते सहाजणांच्या टोळीने मध्यरात्री लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडली. सातारा जिह्यातील सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबविण्यात आली. त्यानंतर आरक्षित डब्यातील झोपलेल्या तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी हिसकावून नेले.

रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास महालक्ष्मी एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळ आली असता, चोरटय़ांनी सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून गाडी थांबवली. यानंतर पाच ते सहाजणांच्या टोळीने महिला प्रवाशांना लक्ष्य केले. कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटय़ांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. दरम्यान, पाठलाग होऊ नये, यासाठी पळून जाताना चोरटय़ांनी एस-2, एस-3 आणि एस-5 या डब्यांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे सुरक्षेसाठी तीन कर्मचारी तैनात असतानाही चोरटय़ांनी लुटमार करून पलायन केले. टोळीतील काहीजण सिग्नल यंत्रणेजवळ थांबले होते, तर काहीजण रेल्वेतूनच प्रवास करीत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, मिरज रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांचे पथक चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी सातारा जिह्यात रवाना झाले. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धावत्या रेल्वेत झालेल्या या लुटमारीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दोन महिलांनी दिली फिर्याद

चोरटय़ांनी मुंबई ते कराड प्रवास करणाऱया सुनीता गोरक्षनाथ तुपे (वय 44, रा. मोठादेवी मंदिर, पंचशीलनगर, कांजूरमार्ग इस्ट, मुंबई) यांच्या गळ्यातील 45 हजार रुपयांचे मंगळसूत्र व त्यांच्या सहप्रवासी सुरेखा बाबासाहेब खाडे (वय 40, रा. वेलविशर टाऊन, खोपोली ता. खालापूर, जि. रायगड) यांची 7 हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरटय़ांनी लंपास केली. या दोन महिलांच्या चोरीबाबत फिर्याद दाखल झाली आहे.

Comments are closed.