गर्भपातप्रकरणी दोन डॉक्टरांसह तिघांना कारावास; 11 वर्षांनंतर खटल्याचा निकाल

बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन डॉक्टरांसह तिघांना दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर 2015 मध्ये पन्हाळा तालुक्यात घडलेल्या घटनेचा 11 वर्षांनंतर निकाल लागला.

डॉ. तानाजी शिवाजी पाटील (वय 42, रा. हरपवडे, ता. पन्हाळा), डॉ. सारिका मधुकर सावंत (वय 35, रा. आपटेनगर, कोल्हापूर) आणि प्रकाश शिवाजी कुंभार (वय 40, रा. मोहरे, ता. पन्हाळा), अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत, तर गजेंद्र ऊर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (वय 39, रा. शिरशी, ता. राधानगरी), कैलास गोपाळदास नोतान (वय 45, रा. गांधीनगर, ता. करवीर) आणि सत्येन सुरेश माळकर (वय 52, रा. कागल) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. तत्कालीन सरकारी वकील ऍड. अमित महाडेश्वर, सहायक सरकारी वकील ऍड. अमृता पाटोळे यांचा युक्तिवाद, वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने दोन डॉक्टरांसह तिघांना दोषी ठरविले.

पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील पीडितेला नोव्हेंबर 2015 पूर्वी पहिली मुलगी झाली. पुढे मुलगी नको, म्हणून सत्येन माळकर याने पुरविलेल्या सोनोग्राफी मशीनवर गजेंद्र कुसाळे याने गर्भलिंग निदान चाचणी केली. त्यात मुलगी असल्याचे निदान झाल्यानंतर कैलास नोतान याने गर्भपातासाठी पीडितेला डॉक्टरकडे पाठविले. गर्भपातानंतर प्रकृती बिघडल्याने महिलेला राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या जबाबानंतर संबंधित महिलेचा पती, डॉक्टरसह सहाजणांविरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नाईक यांनी संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.

Comments are closed.