आठ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्टचा सन्मान
प्रतिस्पर्ध्याला कडवे आव्हान देणाऱ्या वेगवान किक्स, अचूक डावपेच आणि जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर अंधेरीत आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धेने रंगत आणली. कोरियन कॉम्बॅट मार्शल आर्ट ट्रस्टच्या वतीने रविवारी हर्षद वालिया इंटरनॅशनल कॉलेज येथे पार पडलेल्या आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद लाभला. स्पीड किक, पुमसे आणि स्पॅरिंग प्रकारांत खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावत उपस्थितांची मने जिंकली तर संस्थेच्या वतीने आठ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्टने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजक ग्रँडमास्टर परवेझ खान यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत आठ खेळाडूंना कुक्कीवॉनचे आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रसाद आयरे यांच्या हस्ते अहाना चौधरी, अर्जुन देसाई, अमान कुरेशी, अशर सय्यद, अलीजा सय्यद, आर्यमन जैन, ऋषभ जैन आणि विवेक पवनांकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन थाते आणि एच.आर.एच. फाऊंडेशनच्या हजरा रियाज शाह यांच्या हस्ते पदकविजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी मास्टर राजकुमार, ललित कुमार, पंकज कुमार, तृप्ती मेहता, जयकुमार गोयल, सुजीत सिंह, विजय कांबळे, नरेंद्र जाधव, डॉ. जास्मिन ठक्कर, डॉ. अस्मा युसुफ, नियाज अहमद, अमिता भारत, प्रतीक अंभोरे, नूर अहमद, नीरज कुमार, विवेक पवनांकर आणि विशाल उपस्थित होते.
Comments are closed.