मुंबईत काँग्रेस-वंचितकडून आघाडीची घोषणा, वंचित 62 जागांवर लढणार, काँग्रेस किती जागांवर लढणार?
BMC निवडणूक 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आज वंचित आणि काँग्रेसने एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर मैदानात उतरणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारिप सोबत आमची आघाडी होती. 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, असे म्हणत त्यांनी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ आणि तर हा विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, असे देखील ते म्हणाले.
BMC Election 2026: वंचित मुंबईत 62 जागा लढणार
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाइन बैठकीत युतीला मान्यता दिली आहे. 227 पैकी 62 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
BMC Election 2026: काँग्रेस किती जागांवर लढणार?
दरम्यान, काँग्रेस मुंबईत किती जागा लढणार? याबाबतचा आकडा काँग्रेसने गुलदस्त्यात ठेवला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटात जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. काँग्रेसने शरद पवार पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहिती समोर येत आहे. सध्या दोन्ही पक्षात जागा वाटपावर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस मुंबईत किती जागा लढवणार? याबाबत जाहीर केले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Harshvardhan Sapkale: हर्षवर्धन सपकाळ यांच्या लुकची चर्चा
दरम्यान, मागील दोन दशकांपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी अनेकदा हा प्रयत्न केला, पण गणित सुटले नाही. पण आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे युतीचे गणित यशस्वीरीत्या सोडवले आहे. गांधी टोपी, नेहरू जॅकेट आणि धोतर या पारंपरिक लुकमध्ये सपकाळ यांनी आघाडीची घोषणा केली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या लुकची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. युतीमुळे काँग्रेसला प्राबल्य वाढवता येईल की नाही, हे पुढील काळात पाहणे बाकी आहे, पण संकेत स्पष्ट आहेत की, आता काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरायला सज्ज आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.