दिल्लीत ‘आप’चा पराभवाने एका झटक्यात समीकरणं बदलली, काँग्रेसला फायदा, नेमकं काय होणार?

दिल्ली निवडणुकांचा निकाल 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत (Delhi Election Results 2025) एकतर्फी विजय मिळवत भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांपैकी 48 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर 22 जागांवर आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, या निवडणुकीत एकेकाळी दिल्लीची सूत्रे हाती असणाऱ्या काँग्रेसला (Congress) एकही जागा मिळू शकलेली नाही. या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज केल्यामुळे भाजपचे (BJP) मनोबल प्रचंड वाढणार आहे. भाजपच्या या विजयामुळे घरघर लागलेल्या काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, दिल्लीतील पराभव काँग्रेसच्यादृष्टीने चिंताजनक असला तरी दुसऱ्या बाजूला त्यामुळे पक्षाला दिल्लीत नवी उभारी मिळण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला. ‘आप’ची दिल्लीतील 10 वर्षांची सत्ता खालसा झाली आहे. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले असले तरी यामुळे काहीप्रमाणात काँग्रेस पक्षाचाही फायदा होणार आहे.

आम आदमी पक्षाच्या पराभवामुळे काँग्रेसला काय फायदा होणार?

1. ‘आप’च्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अपराजित राहणारा नेता म्हणून असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला तडे.

2. दिल्लीतील पराभवामुळे आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहणार का, याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे.

3. महाराष्ट्र आणि हरियाणापेक्षा दिल्लीतील विजय भाजपसाठी महत्त्वाचा.

4. 2029 साली पंतप्रधान मोदी यांचा चेहरा घेऊन भाजपला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. या विजयामुळे मोदींचा करिष्मा अजूनही शाबूत आहे, या गृहितकाला बळकटी मिळेल. त्यामुळे भाजप पक्षात नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीचा विषय इतक्यात चर्चेला येणार नाही. दिल्लीच्या विजयामुळे आता पंतप्रधान मोदी यांना भाजप पक्षांतर्गत कोणतेही आव्हान उभे राहणार नाही.

5. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड मोदी’ला कलंक लागला होता. मात्र, दिल्लीच्या विजयामुळे हे अपयश धुऊन काढण्यास मदत होईल. लोकसभा निवडणुकीत फटका बसला असला तरी हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत विजय मिळवून भाजपने त्याची कसर भरुन काढली आहे.

6. दिल्लीतील विजयामुळे संसदेत ‘एक देश, एक निवडणूक’ आणि ‘वक्फ सुधारणा विधेयक’ मांडण्यासाठीचा भाजपचा आत्मविश्वास वाढणार आहे.

7. दिल्लीतील विजयामुळे इंडिया आघाडीतील पक्षांनी वेगवेगळे लढून फायदा होत नाही, हे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र लढूनही दिल्लीत काहीही फायदा झालेला नाही. इंडिया आघाडी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या करिष्म्यापुढे फेल झाली आहे.

8. दिल्लीतील पराभवामुळे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाबद्दल ‘आप’मध्ये शंका उपस्थित होऊ शकतात. दिल्लीतील पराभवामुळे अरविंद केजरीवालांच्या दिल्ली मॉडेलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतील.  या पराभवामुळे इतर राज्यांमध्ये ‘आप’चा विस्तार करण्याच्या केजरीवालांच्या मोहीमेला खीळ बसली आहे.

9. दिल्लीत जनमत ‘आप’च्या विरोधात गेल्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर जनतेने मोहर उमटवली, असा प्रचार आता भाजप करेल.

10. दिल्लीतील ‘आप’च्या  पराभवामुळे आता  मद्यधोरण घोटाळाप्रकरणात अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह यांची आणखी कायदेशीर कोंडी होण्याची शक्यता आहे.

11. दिल्लीत पराभव झाल्याने आता पंजाबमध्ये ‘आप’ सरकार डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

12. दिल्लीतील ‘आप’च्या  पराभवामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा पक्ष उभारण्याची संधी मिळेल.

13. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवामुळे आता राष्ट्रीय स्तरावर अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासमोर राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठीचा दबाव वाढू शकतो.

14. दिल्लीतील निकालामुळे इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र राहण्याबाबत शंका उपस्थित झाली आहे.

15. दिल्लीच्या निकालामुळे जो पक्ष जितक्या जास्त मोफत योजना आणि अनुदाने देईल, त्याची जिंकून येण्याची शक्यता वाढते, या गृहीतकाला बळ मिळेल.

https://www.youtube.com/watch?v=CSG1IMWKL58

आणखी वाचा

PM मोदींच्या ‘त्या’ कृतीमुळे दिल्लीची निवडणूक शेवटच्या क्षणी कशी फिरली? ‘आप’च्या नेत्याचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..

Comments are closed.