Mumbai News – मुंबईतील आयसीटीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं
मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली. वसतिगृहातील खोलीत मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. सिद्धेश पाटील असे मयत विद्यार्थ्याचे असून तो केमिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, अशी माहिती संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धेश गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, असे त्याच्या वर्गमित्राने सांगितले. पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.
मंगळवारी संध्याकाळी उशिरा सिद्धेशने आपल्या डॉक्टरांना फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. डॉक्टरांनी तातडीने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना कल्पना दिली. कुटुंबीयांनी संस्थेतील त्याच्या मित्रांशी संपर्क साधून त्याला पाहण्यास सांगितले. मात्र, त्याचे मित्र खोलीवर पोहोचले तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता, असे वर्गमित्राने सांगितले.
उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने सायन रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धेश हा मूळचा नाशिकचा रहिवासी होता.
Comments are closed.