Nanded News – दुष्काळाने पिके हिरावली, दसर्याला झेंडूही रस्त्यावर! शेतकर्यांच्या कष्टांची माती
मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे शेतकर्यांचे आधीच कंबरडे मोडले असताना, नांदेडमध्ये शेतकर्यांच्या कष्टांची माती झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पावसाअभावी सोयाबीन आणि कापसासारखी प्रमुख पिके हातची गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी दसऱ्याच्या सणावर भिस्त ठेवून झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले होते. मात्र, बाजारात फुलांना कवडीमोल भावही मिळाला नाही आणि ग्राहकांनी पाठ फिरवल्याने शेतकरी व विक्रेत्यांवर न विकलेली फुले रस्त्यावरच फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली.
दसरा सणाच्या मुहूर्तावर चांगला नफा मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी आणि किरकोळ विक्रेते मोठ्या कष्टाने फुलांचे ढीग घेऊन नांदेडच्या बाजारात दाखल झाले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे विक्री झालीच नाही. सकाळी २० रुपये किलो दराने विकली जाणारी फुले संध्याकाळी ५ ते १० रुपये किलो दरानेही विकत घ्यायला ग्राहक तयार नव्हते. या दुर्दैवी परिस्थितीमुळे फुले विकून नफा मिळवणे तर दूरच, शेतातून बाजारापर्यंत आणण्यासाठी केलेला वाहतूक खर्चही निघाला नाही, ज्यामुळे विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
पेरणीपासून ते फुलांची तोडणी आणि वाहतुकीपर्यंत शेतकर्यांना मोठा खर्च करावा लागतो. मात्र, बाजारात मागणीचा अभाव आणि पडलेल्या दरामुळे शेतकर्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरले गेले. केवळ झेंडूच नव्हे, तर केळीची पाने, आपट्याची पाने आणि पूजेच्या साहित्यालाही अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. नांदेडच्या रस्त्यावर पडलेले झेंडूच्या फुलांचे ढीग हे केवळ न विकल्या गेलेल्या फुलांचे ढीग नसून, ते शेतकर्यांच्या मोडलेल्या अपेक्षांचे आणि शेतीतील वाढत्या आर्थिक असुरक्षिततेचे प्रखर प्रतीक बनले आहेत.
Comments are closed.