Nanded News – राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सक्षम आमदाराकडे गृहमंत्री पद द्या – रोहित पवारांची मागणी
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, कलावंतच काय सर्वसामान्य माणूस देखील सुरक्षित नाही. प्रत्येक जिल्ह्यात हिच परिस्थिती आहे. मुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांना गृहमंत्रालयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यामुळे एखाद्या सक्षम आमदाराकडे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पद सोपवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
नांदेड येथे ते आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः ढेपाळली आहे. राजकीय नेते, कलावंत या राज्यात सुरक्षित नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या बाबतीत बोलणेच नको, मुख्यमंत्र्यांना या सर्व बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पक्ष फोडणे, वेगवेगळ्या निवडणूका दडपशाहीच्या माध्यमातून व आर्थिक प्रलोभनातून जिंकणे, यातच ते व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जिणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या सक्षम आमदाराकडे गृहमंत्री पद सोपवावे, अशी मागणी आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.