अमर रहे… अमर रहे… समाधान मधाळे अमर रहे! कासार बालकुंदाच्या सुपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
निलंगा-तालुक्यातील कासार बालकुंदा गावचे सुपुत्र जवान समाधान महिपती मधाळे यांच्यावर बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी “अमर रहे… अमर रहे… समाधान मधाळे अमर रहे!” अशा घोषणा देत गावकऱ्यांनी आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.
समाधान मधाळे हे जम्मू-कश्मीर येथे 7 महार रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कासार बालकुंदा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.
परिश्रम करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे डिश सेवेची वृत्त स्वीकारले होते. देशाप्रती असलेली निष्ठा आणि सैन्यात भरती होण्याची जिद्द मनात ठेवून त्यांनी हिंदुस्थानी सैन्य दलात प्रवेश केला होता.
जवान समाधान मधाळे यांचे पार्थिव गावात आणल्यानंतर ग्रामपंचायत मैदानात नागरिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना मानवंदना अर्पण केली आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. गावकऱ्यांच्या वतीने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानंतर गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार भंतेजींच्या मंत्रोच्चारात अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. यावेळी उपस्थित नागरिक भावुक झाले होते.
या प्रसंगी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, डीवायएसपी धुमे, तहसीलदार शिवाजी कदम, एपीआय गरजे, एपीआय वाघमारे, पीएसआय माळवदकर, मंडळ अधिकारी सूरज स्वामी, ग्रामविकास अधिकारी बालाजी नलमले, ग्राममहसूल अधिकारी पाटील, कर्नल पांढरे, कॅप्टन कृष्णागिरी, कॅप्टन रमेश तांबोळे यांच्यासह लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि लातूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
समाधान मधाळे यांच्या पश्चात आई बालीका महिपती मधाळे, पत्नी पल्लवी समाधान मधाळे, पाच वर्षांची मुलगी सानवी, भाऊ दत्ता महिपती मधाळे, भावजय शालिनी दत्ता मधाळे, भाऊ शांतकुमार महिपती मधाळे आणि भावजय पूनम शांतकुमार मधाळे असा परिवार आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. समाधान मधाळे यांच्या निधनाने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
Comments are closed.