गंभीर-अय्यरच्या नावावर 0-4च्या पराभवाचा लाजिरवाणा कलंक! आयर्लंडनंतर इंग्रजांकडून टीम इंडियाची अ

इंग्लंड विरुद्ध भारत 5वी T20I : भारतीय क्रिकेट संघासाठी परदेशातील मालिका एखाद्या दुस्वप्नासारखी ठरत आहे. आधी आयर्लंडविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्यानंतर, आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही भारताला 4-0 असा लाजिवाणा क्लीन स्वीप स्वीकारावा लागला आहे. साउथम्पटन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 56 धावांनी धुव्वा उडवला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ही कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे.

बटलरचे झंझावाती शतक, ब्रूकची नाबाद 95 धावांची खेळी

कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय गोलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बटलरने अवघ्या 41 चेंडूंत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 131 धावांची तुफानी शतकी खेळी केली. दुसऱ्या बाजूने कर्णधार ब्रूकने त्याला तोडीस तोड साथ देत 45 चेंडूंत 4 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 95 धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 233 धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि ऐतिहासिक द्विशतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 257 धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे.

भारतीय गोलंदाजांची धुलाई; शिवम दुबेची चमकला

इंग्लंडच्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांवर कडाडून हल्ला चढवला. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने 4 षटकांत 63, तर प्रिन्स यादवने 60 धावा दिल्या. सूर्यकुमार शेडगेने 3 षटकांत 39 धावा दिल्या. सामन्याच्या 19 व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने भारताला काहीसा दिलासा दिला. त्याने शतकवीर बटलरला आणि त्यानंतरच्या चेंडूवर जेकब बेथेलला (0) बाद करून इंग्लंडला सलग दोन झटके दिले. पण, दुबेने 1 षटकात 22 धावा दिल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णाने 38 धावांत 1 बळी मिळवला. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 33 धावा दिल्या, परंतु त्याला यश मिळाले नाही.

भारतीय फलंदाजांची झुंज अपुरी

258 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाने जोरदार प्रयत्न केले, मात्र भारताला आपल्या 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 201 धावाच करता आल्या. या सामन्यात भारतासाठी ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतके झळकावली. दोन्ही फलंदाज फॉर्मात परतले, परंतु भारतीय संघाच्या नशिबात कोणताही बदल झाला नाही. ईशानने सर्वाधिक 56 धावा केल्या, तर तिलकने 53 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 28, संजू सॅमसनने 27 आणि शिवम दुबेने 14 धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने तीन, तर आदिल रशीदने दोन बळी घेतले. जोफ्रा आर्चर, जोश टंग आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

गंभीर आणि अय्यरवर टीकेची झोड

या पराभवासोबतच भारताने ही मालिका 4-0 अशी गमावली आहे. आयर्लंडसारख्या नवख्या संघाविरुद्ध 2-0 ने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडसमोर भारताला पूर्णपणे निष्प्रभ केले. लागोपाठच्या दोन मालिकांमधील या लाजिरवाण्या कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या रणनीतीवर आता क्रीडा जगतातून तीव्र शब्दांत टीका होत आहे.

हे ही वाचा –

Eng vs Ind 5th T20 : चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला

Comments are closed.