विनायक राऊत यांच्या सुनेचे गंभीर आरोप, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

ठाणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawdi Police Station) हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Crime News : सुनेचे राऊत कुटुंबावर गंभीर आरोप

माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे.

Black Magic Act Row : ‘फिरोज बाबा’ आणि ‘काजी बाबा’ यांच्यावरही गुन्हा

कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विनायक राऊत, मुलगा गितेश राऊत, पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत’ (Anti-Black Magic Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे, या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह ‘फिरोज बाबा’ आणि ‘काजी बाबा’ नावाच्या दोन संशयित व्यक्तींचाही एफआयआरमध्ये (FIR) समावेश करण्यात आला असून त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता ठाकरे गटाकडून किंवा विनायक राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.