Nanded News – वाघी–कामारी पुलाच्या कामावर निकृष्ट दर्जाचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिमायतनगर तालुक्यातील वाघी ते कामारी या महत्त्वाच्या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी माने (वाघीकर) यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघी ते कामारी जाणार्‍या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवाजी माने यांनी केला. पुलाच्या बांधकामात दर्जाहीन साहित्याचा वापर करण्यात आला असून, पुलाच्या काही भागावरील काँक्रीट व मलबा चक्क हाताने निघत असल्याचे एका व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. यावरून कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शासनाने विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असताना, संबंधित कंत्राटदाराने दर्जेदार काम न करता शासनाची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यापुढे त्यांनी असा आरोप केला की, या कामात संबंधित अभियंता (इंजिनीयर) आणि कंत्राटदार यांचे संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण होणे अपेक्षित असताना, निकृष्ट दर्जाचे काम कसे मंजूर झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाघी-कामारी हा रस्ता अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या पुलावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच इतर वाहन धारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. अशा परिस्थितीत पुलाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शिवाजी माने यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पुलाच्या बांधकामाची तांत्रिक तपासणी करावी, कामाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळणार्‍या कंत्राटदार तसेच संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असल्यास त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित कंत्राटदार यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. या आरोपांमुळे वाघी–कामारी पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.