Nanded Accidene News – माहूर गडावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचा टेम्पो 100 फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू, दोघे जखमी
श्रीक्षेत्र माहूर गडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होत असतानाच, रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला माहूर घाटात भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने चालकाचे नियंत्रण सुटून मॅक्सिमो जितो टेम्पो सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला. गुरुवारी (दि. 16) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामागील घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर घडलेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यवतमाळ येथील फर्निचरच्या दुकानात काम करणारे सहा कामगार मॅक्सिमो जितो टेम्पोने बुधवारी (दि.15) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास माहूरकडे दर्शनासाठी निघाले होते. रात्री बाराच्या सुमारास माहूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रम आटोपून गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास यवतमाळकडे परतीचा प्रवास सुरू केला. घाटातील पहिल्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रखर प्रकाश चालकाच्या डोळ्यांवर पडला. त्यातच समोरील वाहन विरुद्ध दिशेने आल्याने चालकाने टेम्पो मोकळ्या जागेकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनाचा तोल बिघडल्याने टेम्पो थेट खोल दरीत कोसळला. या वळणावर संरक्षक कठडे किंवा मजबूत संरक्षक भिंत नसल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात टेम्पोच्या केबिनमध्ये बसलेले चालक प्रतीक अरविंद अडकिने (26), दत्ता मनोहर मेश्राम (35) आणि यशवंत अरविंद पाटील (25), तिघेही रा. यवतमाळ, यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, टेम्पोच्या मागील खुल्या हौद्यात बसलेले बाबाराव ज्ञानोबा टेकाम (60), राहुल सुधाकरराव ठाकरे (25) आणि प्रीतम रामराव प्रधान (38), तिघेही रा. यवतमाळ, हे वाहन दरीत कोसळताना बाहेर फेकले गेले. दरीतील दगडांवर आदळल्याने तसेच अंगावर दगड आणि टेम्पो पडल्याने तिघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यापैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी बाबाराव टेकाम यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली.
अपघाताची माहिती भाविकांनी 112 क्रमांकावर दिल्यानंतर गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि पोलीस कर्मचारी पवन राऊत यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपस्थितांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढणे आव्हानात्मक ठरले. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी आणि पत्रकार गोपाल चव्हाण यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. शारदा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर श्रीनिवास यांनी तातडीने क्रेन उपलब्ध करून दिल्याने दरीत कोसळलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपिन बाभळे यांनी उपचार सुरू असताना बाबाराव टेकाम यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रुग्णालयातील वैद्यकीय व परिचारिका कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत जखमींवर उपचार केले आणि मृतदेहांचे शवविच्छेदन केले. यावेळी एस. बी. बोथिंगे, दत्ता पालटवाड, एस. कुंठेकर, आर. श्रीमंगले, पी. आर. जुडे, जी. आर. भोपाळे, अमृता कऱ्हाळे आणि गणेश धुळगंडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.
पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस हवालदार सत्यमल मडावी, पोलीस कर्मचारी संघरत्न सोनसळे, पवन राऊत तसेच होमगार्ड एस. पी. भगत आणि मुरकुटे पुढील तपास करीत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावर भाविकांची मोठी वर्दळ असताना घाटातील धोकादायक वळणावर झालेल्या या भीषण अपघातामुळे घाटरस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे, भिंती आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना आहेत की नाहीत, याची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Comments are closed.