झेडपी शाळांतील प्रवेशाचा टक्का घसरला, शाळाबाह्य मुलांची संख्या 119 वर; पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल कायम
<<राजेंद्र उंडे>>
राहुरी तालुक्यात यंदाच्या दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षणातून जिल्हा परिषद शाळांतील प्रवेशाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा, शिक्षकांवर सोपविण्यात येणारी शाळाबाह्य कामे आणि व्यवस्थापनातील त्रुटी, यामुळे झेडपी शाळांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या 119 वर गेली असून, त्यात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे.
शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील सुमारे तीन हजार दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी 2153 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये 1143 मुले आणि 1010 मुलींचा समावेश आहे. तर, 933 विद्यार्थ्यांनी खासगी किंवा अन्य शाळांची निवड केली असून, त्यात 496 मुले व 437 मुली आहेत. याशिवाय 56 मुले आणि 63 मुली, असे एकूण 119 विद्यार्थी अद्यापही शाळाबाह्य आहेत.
राहुरी तालुक्यातील 14 केंद्रांपैकी सडे, टाकळीमिया, देवळाली प्रवरा, बारागाव नांदूर, सोनगाव, म्हैसगाव, ताहाराबाद आणि कणगर या केंद्रांमध्ये झेडपी शाळांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, वांबोरी, उंबरे आणि नगरपरिषद क्षेत्रात प्रवेशाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. वांबोरी केंद्रात 239 दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी केवळ 107 विद्यार्थ्यांनी झेडपी शाळेत प्रवेश घेतला असून, याच केंद्रात 52 विद्यार्थी शाळाबाह्य आहेत.
राहुरी नगरपरिषद क्षेत्रातही 474 दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी केवळ 86 विद्यार्थ्यांनी नगरपरिषद शाळा निवडल्या, तर तब्बल 388 विद्यार्थ्यांनी अन्य शाळांत प्रवेश घेतला. नगराध्यक्षपदी शिक्षक असतानाही नगरपरिषद शाळांकडे पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, अनेक गावांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांवर स्थानिक राजकारणाचा प्रभाव वाढल्याची टीका होत आहे. काही गावांमध्ये मात्र तरुण नेतृत्वामुळे समित्यांचे काम सकारात्मक होत असून, पालकांना झेडपी शाळांतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची माहिती देऊन प्रवेशासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मात्र, काही समिती पदाधिकाऱयांची स्वतःची मुलेच खासगी इंग्रजी शाळांत शिकत असल्याने त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिक्षकांवरील शाळाबाह्य कामांचा शिक्षणावर परिणाम
h शिक्षकांवर विविध शासकीय व शाळाबाह्य कामांचा वाढता भारही झेडपी शाळांसाठी अडचणीचा ठरत आहे. शिक्षकांना शैक्षणिक कामांऐवजी इतर कामांमध्ये गुंतविले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भावना आहे. तरीही अनेक शिक्षक नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिक शाळा, इस्रो शैक्षणिक सहल यांसारख्या स्पर्धात्मक संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आजही गुणवत्तेच्या बळावर आपले स्थान टिकवून असल्याचे चित्र आहे.
Comments are closed.